Aundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण आणि दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज -औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अँड.तानाजी चोंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्ती कलापुरे,  डॉ राहुल मनियार,  डॉ.सुहासिनी सातपुते,  आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे होत्या.

मार्गदर्शन करताना डॉ.राहुल मणियार म्हणाले की, सुरुवातीच्या कालखंडामध्ये तंबाखूचे मूळ दक्षिण अमेरिकेत  सापडते. नंतर त्याचा जगभरात झपाट्याने प्रचार आणि प्रसार झाला. कष्टकरी व कामगार वर्गात तंबाखूला कमालीची प्रसिध्दी मिळालेली दिसते. तंबाखूमधील निकोटीन या विषारी पदार्थामुळे माणसाला त्याची सवय लागते. तंबाखू मध्ये चार हजार पेक्षा जास्त विषारी रसायने आहेत. भारतामध्ये चौदा करोड पुरुष आणि चार करोड महिला तंबाखूचे नियमित सेवन करताना दिसतात. भारतात वर्षभरात 43 लाख किलो तंबाखूचे सेवन केले जाते. भारतामध्ये प्रत्येक वर्षी  वीस हजार करोड रुपयांची तंबाखू विकली  जाते. भारत सरकार 27 हजार करोड रुपये तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर खर्च करते. तंबाखूमुळे तोंड,  स्वरयंत्र,  श्वासनलिका,  मूत्रपिंड,  गर्भाशय,  मुखाचा कॅन्सर होतो. केसांची आणि तोंडाची दुर्गंधी येते.दात पडतात, हिरड्यांना इजा होऊन दातांवर चॉकलेटी पिवळे डाग पडतात. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. अकाली वृद्धत्व येते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे शक्यतो तंबाखू खाऊ नये. जर खात असाल तर ती सोडा. जर आपण तंबाखू खाणे सोडले तर आपले जीवनमान सुधारेल,  शारीरिक क्षमता वाढेल,  आत्मविश्वास वाढून आरोग्य वृद्धी होईल. समाजात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे आपण सर्वांनी व्यसन करू नये. याचा प्रचार आणि प्रसार समाजात करायला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, कोणतेही व्यसन हे स्वतःसाठी आणि समाज हिताच्या दृष्टीने घातकच़ असते. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करायला हवी की,  मी व्यसन करणार नाही. आणि समाजातील व्यक्तींनाव्यसन करू देणार नाही. तरच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकेल. आनंदी आणि भरभरून जीवन जगण्यासाठी सर्वांनी व्यसनांपासून दूर राहावे. असे आवाहन प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ यांनी तर आभार प्रा. भक्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय क्यू ए सी कमिटी चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. तानाजी हातेकर,  प्रा.डी. एस.पाटील,  प्रा.प्रदिप भिसे,  प्रा.सायली गोसावी, प्रा.कुशल पाखले, प्रा.मयुर माळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.