Chikhali : विनयभंग प्रकरणी स्कूल बस चालकाला अटक

एमपीसी न्यूज – स्कूल बसला पुढे जाऊ दिले नाही म्हणून चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीचा हात पिरगळला. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे शनिवारी (ता. 15) सकाळी घडली. याप्रकरणी स्कूल बस चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर रत्नाकर ढोले (रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे विनयभंग प्रकरणी अटक केलेल्या स्कूल बस चालकाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला या आपल्या पतीसमवेत दुचाकीवरून जात होत्या. त्या मोरेवस्ती, चिखली येथे आल्या असता स्कूल बस (एमएच 12 / ए यू 7498) वरील चालक ढोले याने त्यांना दुचाकी बाजूला घेण्यासाठी हॉर्न दिला. मात्र दुचाकी बाजूला घेण्यासाठी सध्या जागा नसल्याचे फिर्यादी यांच्या पतीने स्कूल बस चालकाला सांगितले. या कारणावरून चिडलेल्या ढोले याने फिर्यादी यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी फिर्यादी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांच्या हाताची बोटे पिरगळत, अश्‍लील शिवीगाळ करीत त्यांचा विनयभंग केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.