माणसा माणसामध्ये असणारी विषमतेची घाण गाडगे बाबांनी साफ केली : वि. दा. पिंगळे

एमपीसी न्यूज – संत गाडगे बाबा यांनी केवळ जमिनीवरील घाण साफ केली नाही तर माणसा माणसा मध्ये असणारी विषमतेची घाण त्यांनी साफ केली. उघड्या डोळ्यांनी त्यांनी समाजच निरीक्षण केलं आणि विस्कटलेला, दारिद्र्यात पिचत पडलेला, अंधश्रद्धा, कर्मकांड, सावकाराच्या कर्जामध्ये बुडालेला समाज बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. समाज सुधरवण्याचा त्यांचा हा प्रवास खडतर होता पण ते मागे हटले नाहीत. म्हणूनच त्यांनी केलेले काम अलौकिक आहे असे प्रतिपादन साहित्यिक वि. दा. पिंगळे यांनी केले.

पुणे महापालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, वारजे साहित्यिक कट्टा आयोजित शब्दब्रम्ह व्याख्यान मालेत दुसऱ्या दिवशी लोकशिक्षक संत गाडगेबाबा या विषयावर वी. दा.पिंगळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी व्याख्यानमालेचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिंदकेसरी अमोल बराटे, उपस्थित होते.

पिंगळे म्हणाले, महाराष्ट्राच्या मातीत अनेक महापुरुष जन्माला आले. संत महात्म्य जन्माला आले पण आम्ही त्यांना जातीच्या धर्माच्या चौकटीत अडकून टाकलं. कोणत्याच संताला एक जात, एक धर्म अभिप्रेत नव्हता. ही संत मंडळी एका जातीची, धर्माची, पंथाची, प्रांताची नव्हती तर विश्व कल्याणाचा विचार आपल्या जगण्यातून पेरणारी ही सगळी महान लोक होती. जातीच्या चौकटीतून हा महापुरुषांना बाहेर काढणे गरजेचे आहे.

Pune news: रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला

गाडगे बाबा निरक्षर होते त्यांना कुठल्या शाळेत जाता आले नाही. परिस्थितीमुळे शिकता आले नाही पण या माणसाने समाजातील गोरगरिबांच्या मुलांनी शिकले पाहिजे यासाठी शाळा सुरू केल्या. दारिद्रय संपवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा विचार संत गाडगे बाबांनी लोकांना सांगितला.

समाज सुधारायचा असेल तर आपल्याला पुढे यावे लागेल म्हणून या माणसाने एका रात्रीत संसाराचा त्याग करून आपल्या आयुष्याला समाजासाठी वाहून घेतले. गोरगरिबांचे प्रतिनिधीत्व करताना त्याने अंगावर कधी नवी कपडे घातली नाहीत. कायम शिळी भाकरी खाल्ली. हातातला झाडू माझा अलंकार हे सांगण्याच धाडस त्यांच्याकडे होत.

धर्मशाळा उभ्या केल्या पण एक दिवस सुद्धा हा माणूस त्या धर्मशाळेची इमारतीत राहिला नाहीतर रस्त्यावर झोपला. समाजातील विषमता समाजाचं दारिद्रय दूर व्हावं यासाठी आयुष्यातील पन्नास वर्षे दिले. गाडगेबाबा समजून घेणं आणि इतरांना समजावून सांगणे प्रत्येक लेखक आणि विचारवंतांचे काम असल्याचे पिंगळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.