Maval : बाळा भेगडे यांनी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी – दिगंबर भेगडे

'पक्षहितासाठी केशवराव वाडेकरांची भूमिका बजावणार, उमेदवार एकमताने ठरविणार'

एमपीसी न्यूज – पक्षाचा व वरिष्ठ नेत्यांचा आदेश मान्य करून दहा वर्षांपूर्वी मी नवीन चेहऱ्याला आमदारकीची संधी दिली होती. त्याप्रमाणे आता दहा वर्षे आमदार असलेल्या राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मावळातून आमदारकीसाठी नवीन चेहऱ्याला द्यावी, अशी अपेक्षा मावळातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केली. पक्षात कोणतेही वाद-विवाद न होता, एकमताने उमेदवार ठरवून पुन्हा भाजपचाच आमदार करण्यासाठी ज्येष्ठत्वाच्या नात्याने आपण केशवराव वाडेकर साहेबांची भूमिका बजावू, असेही ते म्हणाले.

भाजप हा विचारांचा व संस्कारांचा पक्ष आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कितीही रस्सीखेच सुरू असली तरी उमेदवाराचे नाव हे ज्येष्ठ, कार्ड कमिटी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून एकमतानेच निश्चित केले जाईल, असा विश्वास दिगंबर भेगडे यांनी व्यक्त केला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले तीनही प्रमुख दावेदार हे चांगले आहेत. बाळा भेगडे यांच्या रुपाने तालुक्याला राज्यमंत्रिपद मिळाले, ही निशचितच अभिमानाची गोष्ट आहे. आता त्यांना पक्षाने विधानपरिषदेवर घेऊन कॅबिनेट मंत्री करावे, अशी आमची मागणी राहील. बाळा भेगडे यांना पदोन्नती मिळण्याबरोबरच मावळात नवीन चेहऱ्यास संधी मिळून त्याचा पक्षवाढीसाठी फायदा होऊ शकतो. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके हे दोघांही चांगले ताकदीचे कार्यकर्ते असून त्यापैकी कोणालाही संधी दिली तर तालुक्यातील उमेदवारीचा तिढा सुटू शकेल, असा दावा दिगंबर भेगडे यांनी केला. उमेदवाराच्या नावाबाबत एकमत व्हावे यासाठी आपण तालुक्यातील कार्यकर्त्यांशी, कार्ड कमिटी सदस्यांशी बोलणार आहोत. त्यानंतर सर्व सहमतीने एकच नाव प्रांताकडे पाठविण्यात येईल व त्यानंतर सलग सहाव्यांदा मावळातून भाजपचाच आमदार विधानसभेत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाकडे सत्ता नसताना आपण आमदार होतो, पण आता पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षात थोडेफार बदल झाल्याचे कार्यकर्त्यांना जाणवू लागले आहे. काही नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेल्याची टीका होऊ लागली आहे. पण ही परिस्थिती नक्की बदललेली पहायला मिळेल. भाजप हा विचार व संस्कारांबरोबरच शिस्तीचा पक्ष आहे. तालुक्यातील तेव्हाचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, विश्वनाथराव भेगडे, नथुभाऊ भेगडे आदींनी आदेश दिला, राज्यातील नेते गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांनी सांगितले. आपण त्यांच्या शब्दाचा मान राखला आणि बाळा भेगडे या नव्या चेहऱ्याला संधी मिळाली. आता बाळा भेगडे हे देखील पक्षहितासाठी मनाचा मोठेपणा नक्की दाखवतील. कोणीही बंडखोरीसारखी टोकाची भूमिका घेणार नाही. कोणी तशी भूमिका घेतलीच तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने आपण त्याची समजूत काढून पक्षसंघटनेतील एकजूट कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे दिगंबर भेगडे यांनी सांगितले. तालुक्यात कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून पक्षाचा वटवृक्ष उभारला असून अंतर्गत सत्तासंघर्षातून पक्षाची पिछेहाट झालेली आपण सहन करू शकणार नाही. त्यामुळे पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असेही ते म्हणाले.

मावळ तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांना मावळने आमदार म्हणून निवडून दिले होते. तालुक्यात भाजप वाढण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. आता उमेदवारीसाठी कितीही स्पर्धा दिसत असली तरी कार्ड कमिटी तिन्ही इच्छुकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन तिढा सोडवील. तालुक्यातून सर्वानुमते एकाच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल. निवडणूक व पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते सर्व मतभेद विसरून एकत्र येतील आणि मावळातून सलग सहाव्यांदा भाजपचा आमदार निवडून येईल, असे दिगंबर भेगडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.