Balewadi News : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको !

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने अध्यादेश काढून बळजबरीने लादलेले शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करावेत. तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा आणि कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफी द्यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बालेवाडी फाटा येथे शनिवारी (दि.६ फेब्रुवारी) सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.

‘स्वाभिमानी’चे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्या नेत्तृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यावेळी हनुमंत बालवडकर, अमित कुदळे, सोमनाथ शिंदे, देविदास ववले, सोपान खाणेकर, दिलीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, ऋषीकेश शिंदे आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना देशोधडीला लावणारे तीनही कृषी कायदे केले आहेत, ते आम्हाला मान्य नाहीत. दिल्ली येथे गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत असून त्यात शंभरहून जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.

जगभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून केवळ बैठकांवर बैठका चाललेल्या आहेत. हा चालविलेला खेळ बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.