Baner: तुकाई टेकडीवर विद्यार्थ्यांनी अवघ्या तासात लावली १००१ रोपे!

एमपीसी न्यूज : बाणेर येथील वसुंधरा अभियान संस्थेच्या वतीने तुकाई टेकडीवर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणसह चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सुट्टीचा आनंद घेतला.

संस्थेच्या वतीने तुकाई टेकडीवर पर्यावरणसंवर्धन कार्यासह जैवविविधता प्रसारासाठी अनेक पर्यावरणपूरक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. संस्थेकडून
वृक्षसंवर्धनासाठी आजपर्यंत २६ पाण्याच्या टाक्या बांधल्या असून, यातून वृक्षसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसेच टेकडीवर लोकसहभागातून २३ हजारपेक्षा अधिक देशी झाडे लावली आहेत.

नामवंत अभिनेते व सह्यादी देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत १९०० विद्यार्थ्यांनी १००१ झाडे केवळ
एका तासात लावून तुकाई टेकडीवर आज वृक्षारोपणाचा विक्रम केला. लावलेल्या सर्व झाडांना टॅग लावले असून, प्रत्येक झाडाला विद्यार्थ्यांनी नाव दिले असून, त्या झाडाचे संगोपन संबंधित विद्यार्थी करेल व या निमित्तानेविद्यार्थ्यांचे झाडाशी नाते तयार होईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात
आले.

वसुंधरा सदस्यांनी १००१ वृक्षारोपणाचा संकल्प केवळ चार
दिवसांत पूर्ण केल्याबद्दल अभिनेते शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनाही प्रेरित केले. याप्रसंगी वृक्षवाटपाचा वसा घेऊन जनजागृती करत असलेले ढोले यांनीही मनोगत व्यक्‍त करून संस्थेने यशस्वी नियोजन करून वृक्षारोपणचा वेगळा संदेश दिल्याबद्दल कौतुक केले.

या वेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सयाजी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

परिसरातील २१ शाळांतील १९०० विद्यार्थ्यांनी मुक्‍त वातावरणात, वसुंधरानिर्मित जंगलात, अतिशय सुंदर अशा नयनरम्य वातावरणात पर्यावरणविषयक चित्र रंगविण्याचा
आनंद घेतला. चित्रकला स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून, दरवर्षी हजारो विद्यार्थी यात सहभागी होतात. या निमित्ताने वसुंधराच्या जैवविविधता संवर्धन कार्याची मुलांना ओळख होऊन पर्यावरणसंवर्धन प्रसार होण्यास मदत होत आहे व भविष्यातही होईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी कृषिभूषण शिवराम घोडके, योगीराज पतसंस्थेचे ज्ञानेश्वर तापकीर, दत्तात्रेय तापकीर, हर्षाली माथवड, गणेश कळमकर, तसेच बाणेर, बालेवाडी, पाषाण भागातील मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.