MPC News Anniversary : दीड दशकातील भरारी… सिटी न्यूज पोर्टल ते राष्ट्रीय मानांकन

214 देश, 12,687 शहरे आणि अडीच कोटी युनिक व्हिजिटर्स!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – ‘स्मार्ट सिटी’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट मीडिया म्हणून सुरू झालेल्या ‘एमपीसी न्यूज’ या शहरातील पहिल्या मराठी न्यूज पोर्टलने 15 वर्षांत (MPC News Anniversary) मोठी भरारी घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर पहिल्या 125 न्यूज पोर्टल्समध्ये स्थान मिळविण्याची अभिमानास्पद कामगिरी एमपीसी न्यूजने केली आहे.

दोन सर्वसामान्य पत्रकारांनी लावलेले हे रोपटे आता चांगलेच फोफावले आहे. एमपीसी न्यूजचा नेमका विस्तार सांगायचा तर गुगुल अनॅलिटिक्सवर उपलब्ध आकडेवारीनुसार 214 देश आणि 12 हजार 668 शहरांतून तब्बल 2 कोटी 51 लाख 14 हजार 855 युनिक व्हिजिटर्सनी दिलेल्या अब्जावधी व्हिजिट्स!

एखाद्या संस्थेच्या जीवनात दीड दशकाचा काळ हा काही फार मोठा नसतो, याची आम्हालाही जाणीव आहे. पण या अल्पावधीत आपल्या सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि शुभेच्छा यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची अत्याधुनिक मीडिया हाऊसची गरज पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण आम्ही यावरच समाधानी न होता, महाराष्ट्रातील तसेच देशातील प्रमुख शहरांमध्ये विस्ताराचे नियोजन केले आहे. त्यासाठीही आपल्या सर्वांची मदत आम्हाला लागणार आहे.

——————————–

लवकरच मुंबईसह राज्यात कार्यक्षेत्र विस्तार

एमपीसी न्यूजच्या व्यवस्थापनात यावर्षी काही महत्त्वपूर्ण बदल झाले असून त्यामुळे एमपीसी न्यूजची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील यशानंतर आता एमपीसी न्यूजने कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लवकरच एमपीसी न्यूजचे (MPC News Anniversary) अद्ययावत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाचकांना मुंबईच्या बातम्या देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. या खेरीज येत्या काही वर्षात महाराष्टातील सर्व प्रमुख शहरांमध्ये देखील एमपीसी न्यूज प्रभावीपणे काम सुरू करणार असून त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील न्यूज नेटवर्क अधिक मजबूत होणार आहे.

अमराठी वाचकांसाठी खूशखबर!

अमराठी वाचकांच्या मागणीनुसार एमपीसी न्यूजच्या वतीने लवकरच इंग्रजी न्यूज पोर्टल सुरू करण्यात येणार असून येत्या काही वर्षात हिंदी न्यूज पोर्टल (MPC News Anniversary) देखील सुरू करण्याचा आमचा मानस आहे. मराठी बरोबरच हिंदी यूट्यूब चॅनेल देखील सुरू करण्याचा निर्णय एमपीसी न्यूजने घेतला आहे. त्या माध्यमातून एमपीसी न्यूज राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रभावी कामगिरी करू शकेल असा आम्हाला विश्वास आहे.

 

‘अमृत स्वातंत्र्याचे’ ग्रंथाची निर्मिती

भारताने नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. या 75 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात केलेली वाटचाल, प्रगतीचा आढावा घेणारा तसेच भविष्यातील आव्हानांचा वेध घेणारा ‘अमृत स्वातंत्र्याचे’ या ग्रंथ निर्मितीचे काम एमपीसी न्यूजने हाती घेतले असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ग्रंथासाठी योगदान दिले आहे. या ग्रंथाचे ऑक्टोबर महिन्यात समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात येणार आहे.

टॉप टेन

शहरे       देश

पुणे            भारत

नागपूर         युएसए

पिंपरी-चिंचवड   स्वीडन

मुंबई युनायटेड   किंगडम (यूके)

नाशिक युनायटेड अरब अमिरात (युएई)

बंगळुरू       ऑस्ट्रेलिया

औरंगाबाद      जर्मनी

कोल्हापूर सौदी  अरेबिया

सोलापूर          आयर्लंड

ठाणे               जपान

मराठी वेबसाईटचा इतिहास साधारणतः सप्टेंबर 1996 पासून सुरू झाल्याचे दिसून येते. पहिले मराठी न्यूज पोर्टल 1998 मध्ये सुरू झाल्याची नोंद आढळून येते. फॉन्ट डाऊनलोड करावा लागणाऱ्या वेबसाईट, डायनॅमिक एनकोडिंगमधील वेबसाईट आणि युनिकोडमधील वेबसाईट अशी स्थित्यंतरे मराठी वेबसाईट्सच्या इतिहासात दिसून येतात.

बरोबर 15 वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला आम्ही ‘माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम’ या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळी ‘ऑनलाईन मीडिया’ या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते.

निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने (MPC News Anniversary) हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे. एमपीसी न्यूजचे अनुकरण करीत त्यानंतर शहरात सुमारे अडीच डझन न्यूज पोर्टल सुरू झाली आहेत, हे ‘एमपीसी न्यूज’च्या यशाचे प्रमाण आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक सर्वांच्या निदर्शनास आणू देऊ इच्छतो.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणारे हे न्यूज पोर्टल इंटरनेटच्या जाळ्यातून जगभर पसरेल, याची पुसटशीही कल्पनाही आम्हाला 15 वर्षांपूर्वी नव्हती. शहर व जिल्ह्यातील लोकांना हव्या असणाऱ्या लोकल ब्रेकिंग न्यूज आम्ही देत गेलो. आणि या परिसराशी संबंधित मात्र जगभर विखुरलेले नेटीझन्स एमपीसी न्यूजला जोडले जाऊ लागले.

जगभरातील 214 देशांतील 12 हजार 687 शहरांमधील तब्बल दोन कोटी 51 लाख 14 हजार 855 वाचकांपर्यंत (युनिक व्हिजिटर्स) पोहचण्याचे आणि त्यांच्या पसंतीस उतरण्याचे तसेच विश्वासास पात्र ठरण्याचे भाग्य एमपीसी न्यूजला मिळाले आहे. शहर व परिसराची बित्तंबातमी देणारी अग्रगण्य वृत्तसेवा म्हणून एमपीसी न्यूजचा नावलौकिक झाला आहे. आता एमपीसी न्यूज लवकरच कार्यक्षेत्राचा विस्तार करणार आहे.

देशातील पहिल्या 125 न्यूज पोर्टल्समध्ये स्थान !

डिजिटल विश्वात एमपीसी न्यूजचे स्थान जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ‘सिमिलर वेब डॉट कॉम’ या जगभरातील वेबसाईट्सचा तुलनात्मक डेटा गोळा करणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यानुसार जगातील सर्वप्रकारच्या वेबसाईटमध्ये एमपीसी न्यूजची क्रमवारी म्हणजेच ग्लोबल रँकिंग 27,046 आहे.

देशभरातील सर्व प्रकारच्या वेबसाईट्स म्हणजे एमपीसी न्यूजची क्रमवारी (MPC News Anniversary) म्हणजेच कंट्री रँकिंग 1,906 इतके आहे. देशातील सर्व भाषांमधील न्यूज पोर्टल्समध्ये एमपीसी न्यूजची क्रमवारी 125 आहे. देशातील पहिल्या 125 न्यूज पोर्टल्समध्ये स्थान मिळवू शकलो, याचा आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. हे स्थान आणखी उंचावण्यासाठी टीम एमपीसी न्यूज प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

सुरूवातीला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या आता महिन्याला काही कोटी हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो.

आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणाऱ्या टीम एमपीसी न्यूजने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्‌स सेवा सुरू केली.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्स अ‍ॅप बुलेटीन, ट्वीटर, यूट्यूबच्या माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली. यावर्षी टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरही आपले स्थान निर्माण केले आहे.

बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन स्थानिक बातम्या देणारे एमपीसी न्यूज हे शहरातील पहिले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचा मानही आम्हाला मिळाला. आम्ही गेली दोन वर्षे सकाळी ताज्या बातम्या देणारे ऑडिओ बुलेटीन प्रसारित करून बातम्यांचे श्रवण करण्याचा आनंदही आमच्या श्रोत्यांना दिला.

व्हिडिओ न्यूजवर भर

वाचकांच्या मागणीनुसार आम्ही व्हिडिओ न्यूजचे प्रमाणही हळूहळू वाढवत आहोत. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. मल्टीमीडियाचा वापर करून आम्ही दर्शकांना मोठ्या विश्वासाने ग्वाही देऊ इच्छितो, राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

नागरिकांच्या सुख-दुःखात साथ देणारा हक्काचा सोबती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा आरसा, कोणत्याही पुढाऱ्याचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ हे न्यूज पोर्टल (MPC News Anniversary) आता जणू वाचकांचा ऑनलाईन ‘जीवनसाथी’ बनले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एमपीसी न्यूजने उघडकीस आणली तसेच धसासही लावली. पर्यावरण रक्षणासाठी देखील एमपीसी न्यूजने वेळोवेळी कडक भूमिका घेतल्याचे आपण जाणताच.

हाडाच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांसाठी सिटी न्यूज पोर्टल चालविण्याच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. एमपीसी न्यूज हे मंथन राष्ट्रीय पारितोषिक विजेते महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल आहे, ही बाबही आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.

गेल्या 15 वर्षांच्या काळात आम्ही सहा वेळा एमपीसी न्यूजला नवीन चेहरा दिला. अधिक आकर्षक मांडणी असलेले यूजर फ्रेंडली न्यूज पोर्टल विकसित करण्यासाठी आमचे सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात.

स्थानिक बातम्यांबरोबर राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा देण्यास तसेच मनोरंजन, लाईफस्टाईल, क्रीडा, तंत्रज्ञान अशा जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित लेख आणि माहिती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एमपीसी न्यूजच्या वाचकप्रियतेत अधिकच भर पडली आहे.

शिक्षण संवाद, कला संवाद आणि एमपीसी न्यूज इव्हेंट्स

एमपीसी न्यूजने दोन वर्षांपूर्वी शिक्षण संवाद व कला संवाद ही दोन व्यासपीठे सुरू केली तसेच एमपीसी न्यूज इव्हेंट्स हे नवे दालन खुले आहे. काऊंटडाऊन दहावी, पुरुषोत्तम डेज, रक्षक मातृभूमीचे, आम्ही चालवू हा पुढे वारसा या सारखे दर्जेदार ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रम आमच्या दर्शकांच्या पसंतीस उतरले. यापुढेही आम्ही अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहोत.

जर्नालिझम स्कूल

एमपीसी न्यूज ही पत्रकारितेचे प्रशिक्षण देणारे जर्नालिझम स्कूल म्हणूनही ओळखले जाते. गेल्या 15 वर्षांत एमपीसी न्यूजमध्ये पत्रकारितेचे धडे घेतलेले शंभरहून अधिक पत्रकार विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच न्यूज पोर्टल्समध्ये काम करीत आहेत. काहींनी तर स्वतःची न्यूज पोर्टल्स देखील सुरू केली आहेत. पत्रकारिता करण्याबरोबरच पत्रकार घडविण्याचे काम देखील आमच्याकडून घडत आहे.

स्मार्ट सिटीमधील या स्मार्ट मीडिया हाऊसच्या यशामध्ये आपण सर्व वाचक, दर्शक, हितचिंतक, जाहिरातदार, तांत्रिक सल्लागार, पत्रकार सहकारी व अन्य टीम मेंबर असे आपण सर्वजण बरोबरीचे भागीदार आहात. आपल्या भक्कम पाठबळाशिवाय ही आव्हानात्मक वाटचाल केवळ अशक्य होती. त्यामुळे 15 वा वर्धापनदिन साजरा करीत असताना आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावरील आपला विश्वास आणि प्रेम असेच पुढे राहू देत, हीच विनम्र अपेक्षा!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.