Pune : पोलीस शिपायाचा अधिकारी महिलेवर पोलीस चौकीतच हल्ला; पुण्यातील घटनेने एकच खळबळ

एमपीसी न्यूज – फोर्स (Pune) वनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस चौकीच्या दारातच हल्ला केल्याची घटना घडली. महिला अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात यापुर्वी दिलेली विनयभंगाची तक्रार मागे घेतल्यानंतरही त्याने पुन्हा त्रास दिला. त्याबाबत महिला अधिकारी तक्रार देण्यास सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या. त्यावेळी चौकीच्या दारातच कर्मचाऱ्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

MPC News Anniversary : दीड दशकातील भरारी… सिटी न्यूज पोर्टल ते राष्ट्रीय मानांकन

सिंहगड रोड पोलिसांनी निलेश आंद्रेस भालेराव (वय ३२, रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याला अटक केली आहे. याबाबत ५५ वर्षीय महिला पोलीस निरीक्षकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी पावणे तीन वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा मुंबईत फोर्स वन येथे नेमणूकीला आहे. तक्रारदार या २०१८ मध्ये एमआयए येथे नेमणुकीला होत्या. तेव्हा निलेश फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी आला होता. त्यावेळी त्याने तक्रारदारांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणला. त्यांच्यावर हल्ला केला व विनयभंगही केला. याबाबत महिला अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी निलेशच्या कुटूंबाने विनंती केली. या विनंतीमुळे त्यांनी हा गुन्हा मागे घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटले होते. मात्र, गुन्हा मागे घेतल्यानंतर देखील निलेश हा त्यांना वारंवार मोबाईलवर संपर्ककरुन त्रास देत होता. त्याबाबत वेळोवेळी त्यांनी त्याच्याविरुद्ध सिंहगड पोलिसांत तक्रार दिलेल्या होत्या.

याचदरम्यान, पुन्हा त्रास देत असल्याने महिला अधिकारी पतीसोबत अभिरुची पोलीस चौकीत तक्रार देण्यात गेल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतली. त्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास निघाल्या. तेव्हा निलेश तेथे आला. त्याने हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला, असे मोठ्या ने बोलून या चौकीच्या बाहेर जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. पायर्‍यांवर दरवाजा लगत ढकलून त्यांचा विनयभंग केला. त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.