Bhosari News : विजेचा धक्का लागून पादचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात महावितरणचा संबंध नाही !

महापालिका करते पथदिव्यांच्या खांबांची देखभाल

एमपीसी न्यूज – भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता दुभाजकावरील विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्यामुळे पादचाऱ्याचा रस्त्यावर पडून ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. मात्र या घटनेत वीजखांबाच्या (पथदिव्याच्या) वायरचा शॉक लागल्याप्रकरणी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

रवी महादेव जोगदंड (वय 45, रा. अजंठानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ धीरज महादेव जोगदंड (वय 29, रा. च-होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ट्रक चालक विठ्ठल लक्ष्मण राठोड (वय 34, रा. उंब्रज शिवडे, ता. कराड, जि. सातारा) आणि एमएसईबीचा संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता ओलांडताना दुभाजकावरील विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकने दिलेल्या धडकेत रवी जोगदंड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणकडून लगेचच स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये तो वीजखांब हा पथदिव्याचा (स्ट्रीटलाईट) आढळून आला.

या पथदिव्यांची वीजयंत्रणा ही पिंपरी चिंचवड महापालिकेची आहे. त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देखील महापालिकेकडेच आहे. त्यामुळे पथदिव्याशी व शॉक लागल्याच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही.

याबाबत महावितरणकडून भोसरी पोलिसांना लेखी पत्राद्वारे देखील कळवले असल्याचे महावीतरणने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.