Blog: ‘कोरोना फोबिया’!

Bolg By Siddarth Nikam : Corona Phobia

एमपीसी न्यूज – कोरोना विषयाच्या बातम्या सतत वाचून- पाहून आता प्रत्येकाच्या मनात कोरोनाची चांगलीच भीती बसली आहे. एमपीसी न्यूजचे वाचक सिद्धार्थ निकम यांनी त्यांचा स्वानुभव आमच्याशी शेअर केला. त्यांचा हा ब्लॉग खूप काही सांगून जातो. वाचा त्यांच्याच शब्दांत….

‘कोरोना फोबिया’!

एका शनिवारी माझे चुलतबंधू प्रशांत यांना थकवा जाणवू लागला व अचानक दुसऱ्या दिवशी ताप आला. त्या दिवशी माझी बायको ऋतुजा व वहिनी गीता (प्रशांतची बायको) यांना माहेरी सोडण्याचा प्लॅन प्रशांतने केला होता. पण अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने तो प्लॅन रद्द केला. दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जाऊन वरिष्ठांना प्रकृतीबाबत कळवले. तिथून पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलला जनरल तपासणी करून घेतली. तिथल्या डॉक्टरांनी ‘करोनाचे लक्षण नाहीय, टेस्ट करण्याची गरज नाही,’ असे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.

सर्व सुरळीत झाल्याप्रमाणे मी मेहुण्याला अर्ध्या रास्तात बोलवून घेतले आणि बायकोला माहेरी सोडविले व घरी routine life जगू लागलो. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मोठ्या आईला (मोठी चुलती) हिला कणकण आल्याचे कळाले. तिचे सारखे आजारपण चालू असते म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. बुधवारी माझ्या website चे काम प्रमोदला (प्रशांतचा मोठा भाऊ) दिल्यामुळे मी त्याच्याबरोबर दोन तास मीटिंग केली.

गुरूवारी मोठे चुलते , वहिनी आणि प्रशांत तिघांनाही ताप आला. तेव्हा मात्र पायाखालची वाळू सरकली. काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली. तिघांनीही त्यांचे swab टेस्टिंग साठी नायडू हॉस्पिटलला दिले. साधा ताप आला असेल, रिपोर्ट negative येईल, असा मनाला धीर देत राहिलो. ह्या प्रकारांमुळे बाबांना ऑफिसला न येण्याची विनंती केली. मी सर्वकाही सांभाळतो, असा विश्वास दिला. दरम्यान, प्रमोदबरोबर रिपोर्टचा आढावा घेत राहिलो.

मलाही मधल्या काळात थकवा जाणवू लागला. खूप दिवस काम नाही केले त्यामुळे दमल्यासारखे वाटत असेल म्हणून दुर्लक्ष केले. शुक्रवारी माझाही घसा दुखू लागला. मला काहीतरी गडबडीची जाणीव झाली मी लगेच गरम पाणी पिण्यास सुरवात केली व आपल्या कामाला लागलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायचे म्हणून सकाळी सातला उठलो. थोडा वेळ मोबाईल चाळून सर्व विधी आवरून साडेआठला ऑफिसला निघतो, असं सांगण्यासाठी बाबांच्या रूममध्ये गेलो. तेवढ्यात बाबांना प्रमोदचा फोन आला, ‘तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत’. ऐकून मला धक्काच बसला . मी घाबरून आईला सांगू लागलो. स्थिर राहण्याचे बाबांनी मला ओरडून सांगितलं. बाबानी प्रशांतला कळविले. YCMH ची  अ‍ॅम्ब्युलन्स तिघांनाही घेऊन गेली. नातेवाईक आणि मित्रांचे घरच्यांना फोन येऊ लागले. काळजी घेण्याचे, गरम पाणी पिण्याचे, काढे पिण्याचे सल्ले देऊ लागले. त्या सल्ल्याप्रमाणे घरात गरम पाणी, काढे, वाफ हे सगळे नवीन नवीन प्रयोग सुरू झाले. मनात हीच भीती आपल्याला काही झाले नसेल ना?

माझे साडू समीर झुरुगे यांनीही टेस्ट करून घेतली. त्यांनी खासगी लॅबमधून टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. खासजी लॅबला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. खूप उशिरा संपर्क झाला. त्यांनी डॉक्टरचे prescription मागितले व खूप नियम सांगितले. विचारानंतर बाबांची व माझी टेस्ट करून घेण्याचे ठरले. करण माझा रुग्णाबरोबर संपर्क आला होता आणि मला अस्वस्थ वाटत होते, बाबांना डायबेटीस आहे म्हणून खबरदारी.

मग डॉक्टरचे prescription घेण्याची धावपळ सुरु झाली.डॉक्टरांना संपर्क करू लागलो. डॉक्टर ते अडचणीत येतील म्हणून देण्यास टाळाटाळ करत होते. शेवटी एक डॉक्टर prescription  देण्यास तयार झाले. ते लॅबला पाठवले दोनदा तीनदा चुका दुरुस्त केल्यानंतर लॅबने ते स्वीकारले. दोन दिवसानंतरची वेळ मिळाली.

तोपर्यंत मला रात्री थंडी वाजून यायची, अस वाटायचं की, सकाळी खूप ताप येणार आहे. मध्येच घसा दुखल्यासारखं वाटायचं, अंग दुखायचं, ताप नॉर्मल 95 -96 f असा होता. मला नक्कीच करोना झालाय असं वाटत होतं. माझ्यामुळे घरच्यांना होऊ नये म्हणून माझ्या वरच्या बेडरूममध्ये वेगळा राहू लागलो. माझी कपडे-भांडी मीच धुवत होतो.

दोन दिवसानंतर लॅबवाले टेस्टिंगसाठी नमुने घेऊन गेले. दरम्यान बाबा, राजू मामा, कैलास मामा हे मला काही काळजी करू नकोस, रिपोर्ट negative येईल, असा धीर देत होते. तिकडे बायको, सासू-सासरे सगळे काळजी करत होते. मला नक्की करोना झालाय, असं माझ्या मनात बसलं होतं. आता हॉस्पिटलमध्ये जावं लागणार हे मनाशी पक्कं केलं होतं. उपचारासाठी कोणते हॉस्पिटल चांगले आहे , खासगी हॉस्पिटलला जाऊ की सरकारी हॉस्पिटलला जाऊ, याचा विचार करत होतो.

खासगी हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहे का, इन्शुअरन्स आहे का, याची चौकशी करत होतो.  रात्री बारा वाजता रिपोर्ट येणार होता. रात्रभर मोबाईल उघडून रिपोर्ट आला की नाही, हेच बघत होतो. शेवटी सकाळी लॅबमध्ये फोन केला. त्यांनी दोन तासांत रिपोर्ट येईल, असे सांगितले.

शेवटी वाट बघितल्यानंतर तीन वाजता रिपोर्ट आला. अनपेक्षितपणे माझा रिपोर्ट negative आला होता. बघून खूप आनंद झाला. पहिला फोन सासऱ्यांना केला, ते रात्री तीन वाजल्यापासून काळजीने जागे असल्याचे त्यांनी सांगितले. रिपोर्ट ऐकून ते आनंदाने भावूक झाले. मग राजूमामा व इतर नातेवाईकाना फोन करून सांगितले. सगळे खूश झाले व सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

रिपोर्ट कळल्यानंतर मला परत कधीच ताप आला नाही, थंडी वाजली नाही किंवा अंग दुखले नाही. कदाचित मला ‘ कोरोनाफोबिया’ झाला होता, रिपोर्ट आल्यानंतर तो बरा झाला.

(टीप – करोना झालेल्या सर्वाची तब्येत आता सुधारत आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.)

– सिद्धार्थ निकम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.