Mumbai: संजय राऊत यांचे राज्यपालांना कोपरापासून दंडवत! फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

Mumbai: Sanjay Raut bows to Governor from the corner! The photo went viral

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे खासदार व शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी काल (शनिवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशात तो चर्चेचा विषय झाला आहे. राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने या फोटोची अधिक चर्चा रंगली आहे.

त्यावर राऊत यांनी स्पष्टीकरणही दिले असून राज्यपाल हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असल्याने त्यांना असा नमस्कार केल्याची सारवासारव राऊत यांनी केली आहे तर या फोटोवरून भाजपने राऊत यांच्यावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.

संजय राऊत यांनी शनिवारी अचानक राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 15 ते 20 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. राऊत यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. या बैठकीनंतर राऊत यांनी, राज्यपाल आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगत नरमाईची भूमिका घेतली.

त्यामुळे शिवसेनेचा राज्यपालांवरील राग शांत झाल्याचे बोलले जात असतानाच राऊत-राज्यपाल भेटीचा फोटोही व्हायरल झाला. राज्यपालांनी तसेच स्वतः राऊत यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत राऊत राज्यपालांना कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत.

राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले; कोणताही दुरावा नाही: राऊत

राऊत यांच्या या फोटोचे राजकीय अर्थ काढले जात असतानाच राऊत यांनी त्यावर खुलासाही केला आहे. भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून हा नमस्कार केला. अन्यथा आमच्या चांगला संवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे महाविकास आघाडी सरकार सुरळीतपणे सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसं ट्विटच त्यांनी केलं.

धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब ‘सामना’ हो गया!

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यपालांना घेरणाऱ्या राऊतांना भाजपने घेरलं नसतं तर नवलंच. भाजपने या फोटोवरून राऊत यांनाही चांगलेच चिमटे घेतले आहेत. धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब ‘सामना’ हो गया’, असं ट्विट करत भाजपने राऊतांना चिमटा काढला आहे. दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.