Entertainment News : ‘मुळशी पॅटर्न’ नंतर पुनित बालन स्टुडिओज घेऊन येत आहेत ‘जग्गू आणि ज्युलिएट’

0

एमपीसी न्यूज: युवा उद्योजक, निर्माते पुनित बालन यांनी त्यांच्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या नव्या चित्रपटाची घोषणा नववर्षाच्या सुरवातीला केली आहे. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहेत. चित्रपटाचे 90% चित्रीकरण हे युरोपात होणार आहे.

सोशल मीडियावर नुकतेच या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कथा व पटकथा गणेश पंडित, महेश लिमये आणि अंबर हडप या तिघांची आहे. महेश लिमये यांना यापूर्वी ‘यलो’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर लिमये आता ‘जग्गू आणि ज्युलिएट’चे दिग्दर्शन करीत आहेत.

यापूर्वी पुनित बालन, महेश लिमये आणि अजय-अतुल यांनी केलेल्या ‘आशेची रोषणाई’ या लघुचित्रपटाला जगभरातील रसिकांची पसंती मिळाली. विविध पुरस्कारांनी या कलाकृतीला सन्मानितदेखील करण्यात आले. आता पुन्हा हे त्रिकुट या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आल्याने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर नेटीझन्सचा चर्चेचा विषय ठरलेल्या या पोस्टरमध्ये दोघा जणांनी एकमेकांच्या हातात हात घेतलेले आहेत. पण हे हात कोणाचे आहेत, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

सामाजिक आशयावरील ‘मुळशी पॅटर्न’ला आणि कोरोना काळातील आमच्या तीन लघुचित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच प्रेक्षकांना आनंद देणारा, एका वेगळ्या धाटणीचा, कलरफुल, रॉमकॉम असा चित्रपट आम्ही घेऊन आलो असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.