Bopkhel : बोपखेल पुलाच्या रखडलेल्या 10 टक्के कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका टॉवरच्या अडथळ्यामुळे ( Bopkhel) रखडलेल्या बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम सुरू झाले.  पुढील दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन  नागरिकांसाठी वापराकरिता खुला होईल.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) 13 मे 2015 रोजी बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडीमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर एक हजार 866 मीटर म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्यात येत आहे.

पुलाचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब या कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास दोन ऑक्टोबर 2021 ला परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.

पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. उच्चदाब वाहक विद्युत तारांच्या टॉवरचे स्थलांतर केल्यानंतरच काम करता येणार होते. त्यासाठी बोपखेलच्या बाजूने एक टॉवर उभारणे आवश्यक आहे. खडकीकडील जागा ताब्यात आली असून, तेथे पाच टॉवर उभारून तारांची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने ते काम रखडले होते.

Pune : बारावीच्या पहिल्या पेपरला राज्यभरात 58 गैरप्रकांराची नोंद, पुण्यात 15 गैरप्रकार उघडकीस

प्रशासन आणि जागा मालक यांच्यात तोडगा निघत नव्हता. माजी उपमहापौर, माजी स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासन आणि जागा मालकांमध्ये समन्वय घडवून आणला.  जागेचा मोबदला भविष्यात टीडीआर स्वरूपात दिला जाईल. महापालिकेच्या विनंतीवरून जागा मालकांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर दोन दिवसांपासून काम सुरू झाले आहे.

जागेमुळे बोपखेल पुलाचे 10 टक्के काम रखडले होते. जागा मालक आणि महापालिका प्रशासनात समन्वय साधून प्रश्न सोडविला. बोपखेलवासीयांना नऊ वर्षांपासून 15 किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. वेळ, पैसा वाया जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कामाला गती द्यावी. दोन महिन्यात काम पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याचे माजी उपमहापौर घुले यांनी सांगितले.

जागेच्या मार्किंगवरून जमीनधारकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. मार्किंग दाखवून जागा मालकांचा संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून काम सुरू झाले आहे. आगामी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल असे कार्यकारी अभियंता महेश कावळे यांनी ( Bopkhel) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.