Rajgurunagar News : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती…

माजी माहिला सरपंच साधना सातकर यांच्या प्रसंगावधानामुळे 5 जणांचे प्राण वाचले आहेत.

एमपीली न्यूज – ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशी आपल्याकडे म्हण आहे, याचाच अनुभव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आला आहे.  रविवारी (दि. 13) राजगुरूनगर जवळच्या सातकर स्थळ गावाजवळून दुथडी भरून वाहणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरुन प्रवास करताना महिला कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी बलेनो कार पाण्यात पडल्याची घटना घडली.

यावेळी माजी माहिला सरपंच साधना सातकर यांच्या प्रसंगावधानामुळे 5 जणांचे प्राण वाचले आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आईवडिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. पण पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली आहे. हा सगळा थरार मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे.

काल दुपारी सातकर स्थळ येथे माजी महिला सरपंच साधना सातकर आपल्या घरासमोर असताना त्यांनी ही कार पाण्यात पडताना पाहिली. साधना यांनी आरडाओरड करत जवळच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. यात साधना यांचे पती अशोक सातकर, संदीप सातकर, तुषार सातकर, सुदर्शन मुळूक, माजी उपसरपंच सचिन सातकर, अविनाश खांगटे, ॠषीकेश सातकर यांनी वाहत्या पाण्यात उड्या मारत कारचे दरवाजे उघडून कार मधील 3 चिमुकल्यांना व त्यांच्या आईवडिलांना बाहेर काढले.

या कारमध्ये राजगुरूनगर येथील एका सोसायटीमधील रहिवासी शिक्षक गणेश मगर यांच्या पत्नी व 3 मुले असल्याचं समजले आहे. या प्रसंगानंतर थोड्याच वेळात पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेली कारही काही अंतरावर जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.