Mumbai : जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक; सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या केंद्राकडून सर्व राज्यांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जुंतकीरणासाठी डोम, टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसून या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो. फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

यावर राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी राज्यातील सर्व विभागांना पत्राद्वारे सूचना दिल्या. पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये.

रविवारी (दि. 19) सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो, याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.