Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Two-wheeler killed in unidentified vehicle collision

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याने जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोरी येथे घडली. याबाबत 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक ज्ञानेश्वर यादव (वय 44, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव जाधव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी सायंकाळी सहा वाजता मयत दीपक हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / एफवाय 3230) पुणे-नाशिक महामार्गावरून चाकणकडून खेडकडे जात होते. ते मोरी गावच्या हद्दीत आले असता अज्ञात वाहनाने दीपक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यामध्ये दीपक गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दीपक यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.