Pune News : भारताच्या लष्करप्रमुखांनी काढले सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्याविषयी गौरवोद्गार (Video)

एमपीसी न्यूज – भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मराठा सैन्याच्या एकमेव महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. भारताच्या लष्करप्रमुखांनी प्रथमच सरसेनापती उमाबाईसाहेबांच्या पराक्रमाविषयी भाष्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जरनल नरवणे बोलत होते. लष्कराचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

भारताच्या इतिहासात महिला सुद्धा लढलेल्या असून त्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांत लिहिला गेला आहे, असे ते म्हणाले. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबरच त्यांनी सरसेनापती उमाबाईसाहेबांच्या पराक्रमाचा आवर्जून उल्लेख केला.

सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांचा इतिहास दैदीप्यमान असून त्यावर अधिक संशोधन व अभ्यास होणे व तो लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

श्रीमंत सरसेनापती सेनाखासखेल सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे यांनी 2011 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सरसेनापती उमाबाईसाहेबांविषयी केलेल्या नोंदीचाही जनरल नरवणे यांनी भाषणात उल्लेख केला.

सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्यावरील ‘भद्रकाली’ या आगामी चित्रपटासाठी लेखक दिग्पाल लांजेकर व टीमला जनरल नरवणे यांनी वैयक्तिक शुभेच्छा कळवल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.