Pimpri News: भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पासाठीच्या जागा तातडीने ताब्यात घ्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात शहराची तहान भागविण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या दृष्टीने सध्या भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, वेळेत हे पाणी शहवासीयांना उपलब्ध व्हावे. त्यादृष्टीने प्रशासनाने गतीने काम करावे. प्रकल्पासाठीची उर्वरीत जागा सर्व्हेक्षण करून तातडीने ताब्यात घ्यावी अशा सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिल्या.

आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच या कामांबाबत सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी सह शहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, विद्युत विभाग कार्यकरी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता मांढरे साहेब, पाणी पुरवठा उपअभियंता चंद्रकांत मुठाळ आदी उपस्थित होते.

शहराला पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. समाविष्ठ गावांतील पाणीपुरवठा आजही विस्कळीत आहे. ‘भोसरी व्हीजन-2020’ या अभियानांतर्गत पाणीपुरवठा सक्षमीकरणाचा संकल्प केला होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोविड परिस्थितीमुळे या प्रकल्पाच्या कामाला अपेक्षीत गती मिळत नव्हती. नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध व्हावे आणि भविष्यातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यादृष्टीने भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आण्ण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हे पाणी तळवडे व चिखली येथील अशुध्द जलउपसा केंद्र येथे आणण्यात येणार असून, या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

बैठकीमध्ये प्रकल्पानिहाय सद्यस्थिती व कामात असलेल्या अडी-अडचणींबाबत माहिती घेतली. भामा आसखेड धरण ते नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टँक पर्यंत 8.8 कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच, नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टँक ते देहूपर्यंत 18.9 कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकणेत येणार आहे. अशी एकूण 27.70 कि.मी. लांबीच्या जलवाहिनीकरिता लागणाऱ्या एकूण पाईप पैकी 7.6 कि.मी. लांबीचे पाईप साईटवर पुरविण्यात आलेले आहेत. त्यापैकी 6.4 कि.मी. लांबीच्या पाईपचे इनलायनिंग व गनायटींग करणेचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनीच्या एकूण लांबीपैकी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारितील ज्या रस्त्यांच्या कडेने जलवाहिनी टाकणेची परवानगी पालिकेस मिळालेली आहे. त्या ठिकाणी जलवाहिनी टाकणेचे काम करणेत येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पाअंतर्गत अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत संयुक्त आढावा बैठक घेतली. शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग उर्वरीत जागा सर्व्हेक्षण करून तातडीने ताब्यात घ्या अशा सूचना दिल्या. तसेच, नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकची जागा व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीमधील रस्त्याने जलवाहिनी टाकण्याची जागा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देहूपासून भंडारा डोंगरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता खोदाईस परवानगी दिली असुन त्या ठिकाणी तातडीने काम सुरु करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.