Chikhali Crime News : आणखी एका गॅरेज चालकाला गोळीबार करत धमकावल्या प्रकरणी गायकवाड पिता-पुत्रासह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सांगवी येथील एका गॅरेज चालकाला गायकवाड पिता-पुत्रासह चौघांनी फार्म हाऊसवर नेऊन गोळीबार करत धमकी दिल्याचा प्रकार ताजा असतानाच चिखली येथेही असाच प्रकार उघडकीस आला आहे.

चिखली मधील एका गॅरेज चालकाला दिलेल्या 10 लाखांच्या बदल्यात 22 लाख रुपये वसूल करून फार्म हाऊसवर नेऊन हवेत गोळीबार करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गॅरेज चालकाच्या पाच गुंठे जागेचे खरेदीखत जबरदस्तीने करून घेतले. याप्रकरणी गायकवाड पिता-पुत्रासह चार जणांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), राजाभाऊ अंकुश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मिश्रा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चिखली येथील एका गॅरेज चालकाने मंगळवारी (दि. 24) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे साने चौक, चिखली येथे अंश ऑटोविल नावाचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेज मध्ये गायकवाड पिता-पुत्र त्यांच्या गाड्या दुरुस्तीसाठी घेऊन येत असत. फिर्यादी यांना गॅरेजमध्ये नवीन मशिनरी आणण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी गायकवाड पिता-पुत्राकडून 10 लाख रुपये उसने घेतले.

आरोपींनी फिर्यादी यांना पाच टक्के दराने कर्ज देऊन फिर्यादी यांच्याकडून पाच-पाच लाख रुपयांचे दोन चेक लिहून घेतले. फिर्यादी यांनी घेतलेल्या 10 लाख रुपये कर्जापोटी 22 लाख रुपये वसूल केले. मुद्दलापेक्षा अधिक पैसे दिलेले असताना मुद्दल व व्याज मिळण्यासाठी सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना कर्जाचे व्याज थकल्याचे सांगत वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी राजाभाऊ याने फिर्यादी यांना त्यांच्या गॅरेज मधून जबरदस्तीने गाडीत घालून गायकवाड यांच्या औंध येथील घरी नेले. तिथून त्यांना सुसगाव येथील फार्म हाऊसवर नेले. फार्म हाऊसवर दमदाटी व मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना रूममध्ये कोंडून पिस्टलचा धाक दाखवून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. व्याजाचे पैसे वेळेवर दे नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देऊन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांची पाच गुंठे जागेचे मूळ खरेदीखत जबरदस्तीने घेतले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.