Talegaon Dabhade News : एनसीईआर महाविद्यालयाच्या 51 विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी केली 51 पेटंटची नोंदणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या महाविद्यालयातील 51 विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी 51 पेटंटची नोंदणी केली. हे सर्व विद्यार्थी विविध शाखांच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. दैनंदिन वापरातील साहित्य, लेखणी, वैयक्तिक, रस्ते सुरक्षा, वाहनातील आधुनिक बदल यांसारख्या विषयांवर हे पेटंट आहेत. या विक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.

येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या महाविद्यालयाने नावाला साजेशी अशी कामगिरी करून विविध शास्त्र शाखातून प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी 51 पेटंटची नोंदणी करून सुवर्ण विक्रम नोंदविला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी सांगितले की, शिक्षण मंत्रालय भारत सरकार सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये नावीन्यपूर्ण संस्कृतीला पद्धतशीपणे चालना देण्यासाठी इनोवेशन कौन्सिल सेलची स्थापना केली आहे. या अंतर्गत तरुण विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांसह कार्य करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने संस्थेत इन्स्टिट्यूशन इनोवेस्शन कौन्सिलची स्थापना केली आहे. याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या नाविन्य पूर्ण निर्मिती व संकल्पनाने अधिकृत 51 पेटंटची एका दिवसात नोंदणी केली आहे. या कामगिरीत प्रथम वर्षातील एकूण 51 विद्यार्थ्यांचा व प्रा. नीलिमा घाडगे यांचा सहभाग आहे.

नोंदणी केलेल्या पेटंटमध्ये दैनंदिन वापरातील साहित्य, लेखणी, वैयक्तिक व रस्ते सुरक्षा सोबतच वाहनातील आधुनिक बदल आदी बाबींचा समावेश आहे. संस्थेच्या अनुसंधान व विकास अधिष्ठाता प्रा. नीलिमा घाडगे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये करण्याचा मानस आहे. संस्थेत अनुसंधान व विकासास चालना मिळण्यास पूरक वातावरण व प्रोत्साहन देण्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे व प्राचार्यांचे आभार मानले.

याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. ललित कुमार वाधवा व सर्व विश्वस्त मंडळाने तसेच प्राचार्य. डॉ. संजय क्षीरसागर यांनी अनुसंधान व विकास विभाग अधिष्ठाता प्रा. नीलिमा घाडगे व पेटंट नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.