Chikhali News : ‘पंतप्रधान आवास’च्या अर्जांची सोडत ताबडतोब घ्या – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी हजारो गोरगरीब नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, या अर्जांची सोडत कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळत नसल्याने अर्जदारांमध्ये घालमेल सुरु आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जाची त्वरित सोडत घेण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी झोपडपट्टी निर्मूलन तथा पुनर्वसनचे सहायक आयुक्त राजेश आगळे यांना निवेदन पाठविले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महापालिका प्रधानमंत्री आवास योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे अर्थ सहाय्य असणार आहे. या योजनेसाठी महापालिका प्रशासनाने दोनदा अर्ज मागविले होते.  पन्नास हजारांच्या आसपास नागरिकांनी मोठ्या अपेक्षा ठेऊन घरांसाठी अर्ज सादर केलेले आहेत. त्यासोबत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्टही दिला आहे.

या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत संपून बराच काळ उलटून गेला आहे. याच योजनेसाठी पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी सोडत घेण्यात आली होती आणि त्यांनतर त्यांनी लाभार्थी नागरिकांची नावे सार्वजनिक केली होती.

मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून याबाबत काहीही माहिती देण्यात आली नसल्याने अर्जदारांची घालमेल वाढली आहे. याबाबत संबंधित अर्जदार नगरसेवक आणि मनपा पदाधिकारी यांना कधी सोडत काढणार याबाबत माहिती विचारू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर दिनेश यादव यांनी महापालिका सहायक आयुक्त राजेश आगळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेबाबत चर्चा केली. तसेच या योजनेसाठी लवकरात लवकर लाभार्थी सोडत घेण्याची मागणी केली.

प्रत्यक्ष सदनिका तयार होऊन त्या लाभार्थ्यांच्या ताब्यात मिळण्यासाठी किती कालावधी लागणार ? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे दिरंगाई न करता या योजनेला गती द्यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.