Chikhali : बहिण राखी बांधायला येणार होती, पण…

चिखली येथील आगीत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एमपीसी न्यूज – पूर्णानगर चिखली येथे दुकानाला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचे संपूर्ण कुटुंब मृत पावले. कुटुंब प्रमुख ( Chikhali ) असलेल्या चौधरी यांची बहीण राखी बांधण्यासाठी येणार होती. ती घरातून निघतानाच तिला भावाच्या मृत्यूची माहिती मिळाली आणि सणाच्या दिवशी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे घडली. चिमणाराम बेणाराम चौधरी (वय 48), नम्रता चिमणाराव चौधरी (वय 40), सचिन चिमणाराम चौधरी (वय 13), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
चिमणाराम यांचा हार्डवेअरचा व्यवसाय होता. चार दिवसांपूर्वी हे कुटुंब काश्‍मीर सहलीला गेले होते. मंगळवारी (दि. 29) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ते पुन्हा शहरात आले. मंगळवारी त्यांनी पुन्हा दुकान उघडून व्यवसाय सुरू केला. गेल्या दहा वर्षांपासून ते व्यवसाय करीत होते. तसेच दुकानातील पोटमाळ्यावर त्यांनी राहण्यासाठी घर केले होते. रात्रीच्या वेळी ते दुकानाचा पुढील दरवाजा बाहेरून बंद करीत होते व बाजूला असलेले शटर आतून बंद करीत होते.
बुधवारी पहाटे 5.25 वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची वर्दी पूर्णानगर मधील पूजा हाइटस्‌मधील रहिवाशांनी अग्नीशमन विभागाला दिली. त्यानुसार चिखली उपविभागाचा बंब अवघ्या पाच मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाला. दुकानात चारजण अडकले असल्याची माहिती त्यांनी अग्निशमन मुख्यालयास दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे दहा बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीने संपूर्ण दुकानाला वेढले होते. आगीमुळे दुकानाचे शटर पूर्ण लाल झाले होते. त्यामुळे शटर उचकटण्यात अग्निशामक दलास ( Chikhali ) अडचण येत होती. अखेर साखळीचा हुक शटरला अडकवून गाडीने ओढल्यानंतर शटर उचकटले. टर्पेटाईल, थिनेल आणि रंगाचे डबे यांनी पेट घेतल्याचे दिसून आले. दीड तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत आतील चारही जणांचा मृत्यू झाला होता.
दुकानात अगदी शेवटी पोटमाळ्यावर जाण्यासाठी जिना होता. जिन्यावरून उतरून चिमणाराम हे बाहेर जाण्यासाठी असलेल्या जिन्याजवळ मृत अवस्थेत मिळून आले. तर त्यांची पत्नी नम्रता ह्या दुकानात आतून लावलेल्या कुलूपाच्या चावीजवळ मिळून आल्या. भावेश हा मुलगा पोटमाळ्यावरून खाली आल्याचे आढळून आले. त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार, धूर आणि आग यामुळे त्यांना आपली सुटका करता आली नसल्याचे घटनास्थळावरून दिसून आले. तर लहानग्या सचिनचा मृतदेह पोटमाळ्यावर आढळून आला.
चार दिवसांच्या सहलीवरून चौधरी कुटुंबीय मंगळवारी शहरात आले होते. बुधवारी रक्षाबंधन सण असल्याने त्यांची कोंढव्यात राहणारी बहीण चौधरी यांच्या घरी येणार होती. तसेच पिंपरी चिंचवड शहरात चौधरी यांचे चुलत भाऊ देखील राहतात. तिकडेही बहिण जाणार होती. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे चौधरी यांच्या बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला ( Chikhali ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.