Chinchwad : वाहतूक विभागाची विशेष मोहीम; तीन दिवसात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चे 123 गुन्हे!

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शुक्रवार (दि. 9) ते रविवार (दि. 11) या तीन दिवसांच्या विशेष मोहिमेत पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून 123 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबवण्यात येते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दहा वाहतूक विभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. वाहतूक विभागाच्या हद्दीत मुख्य चौक, रस्त्यांवर ही कारवाई मोहीम राबवली. यामध्ये वाहनांची तपासणी करून मद्य प्राशन करून वाहन चालवणा-या वाहन चालकांवर कारवाई केली. संबंधित वाहनचालकांवर चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.

  • मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास पोलिसांकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. आरोपींना सुमारे 2 हजार 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच वाहन चालकाचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. वाहनचालकावर एखाद्या कलमाची वाढ केल्यास दंडामध्ये वाढ देखील होऊ शकते.

वाहतुकीचे नियम मोडणा-या 623 चालकांकडून दंड वसूल
सिग्नलवर, रस्त्यांवर अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडून जातात. आपल्यावर कारवाई होऊ शकते, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नसते. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनांचे नंबर घेऊन वाहनाने केलेला नियमभंगाचा पुरावा घेऊन संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईची रीतसर पावती वाहन मालकाच्या घरी पोस्टाने येते. अचानक आलेल्या दंडाच्या पावतीमुळे नागरिक हडबडून जातात.

  • वाहनाने कुठे, कोणता नियम मोडला? याबाबत ऑनलाईन माहिती मिळते. माहिती मिळून देखील अनेकदा वाहन मालकांकडून आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जाते. अशा वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहतूक विभागाकडून नाकाबंदी केली जात आहे.

दंड भरण्यासाठी टाळाटाळ करणा-या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी शनिवारी (दि. 10) आणि रविवारी (दि. 11) या दोन दिवसात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण 623 वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. नोटीस येऊन देखील दंड न भरणा-या वाहनचालकांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.