Chinchwad : महामार्गावरून वेगात प्रवास केल्यानंतर दंडाची पावती आल्यास आश्चर्य नको; जाणून घ्या कारण…

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातून (Chinchwad) जाणा-या जुना पुणे-मुंबई महामार्गावरून वेगात वाहन चालवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज आल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासनाने महामार्गाची वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित केली आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीडगन देखील बसवल्या आहेत.

जुना पुणे-मुंबई महामार्गाचा दापोडी ते निगडी (भक्ती शक्ती चौक) दरम्यानचा 12 किलोमीटरचा मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत येतो. या मार्गावर अवघे दोन सिग्नल असून दापोडी पासून अवघ्या काही मिनिटांमध्ये हा रस्ता प्रवाशांना शहरातून बाहेर काढतो. महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, महावीर चौक, चिंचवड स्टेशन चौक, खंडोबा माळ चौक या ठिकाणी अंडरपास असून महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता आहे.

यासोबत शहरातून मुंबई-बेंगलोर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग हे दोन प्रमुख रस्ते जातात. देहू आळंदी येथे येणाऱ्या भाविकांसाठी दिघी आळंदी रस्ता, देहू आळंदी रस्ता, उद्योगनगरीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला निगडी भोसरी टेल्को रोड, भक्ती शक्ती चौक ते जय गणेश साम्राज्य (Chinchwad) चौक स्पाईन रोड, आयटीनगरीसाठी नाशिक फाटा ते वाकड मार्गे हिंजवडी रस्ता, औंध रावेत, किवळे बीआरटी मार्ग, काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी मार्ग असे महत्वाचे रस्ते जातात. या मार्गावर शहरात सर्वाधिक वाहतूक असते.

Pune : ओझर येथे भरणार द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

अलीकडच्या काळात महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या या मार्गांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या प्रमुख मार्गांवरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांची संख्या घटेल, असा निष्कर्ष काढत त्यानुसार वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर स्पीडगन लावण्यात येत आहेत. त्यामुळे महामार्गावरून ताशी 40 किलोमीटर या वेगाने जावे लागणार आहे. अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनाची नोंद स्पीडगन घेणार असून गाडीच्या क्रमांकावरून गाडीच्या मालकाच्या मोबाईलवर ओव्हरस्पीडचे चलन पाठवले जाणार आहे. यात मानवी हस्तक्षेप कुठेही नसेल.

निगडी ते दापोडी दरम्यान मुंबई-पुणे महामार्ग, आळंदी ते दिघी रस्ता या मार्गांवर ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केली आहे. स्पाइन रोडवर ताशी 50 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित केली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, वाकड-हिंजवडी रस्ता, निगडी-भोसरी टेल्को रस्त्यावरही वेग मर्यादा निश्चित केली जाणार आहे.

पालिकेचा हेतू सफल होत नाही –

शहरवासियांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने जुना पुणे मुंबई महामार्ग बनवला. महामार्गाच्या बाजूने सेवा रस्ता करताना अनेक दुकाने आणि घरे पाडण्यात आली. वेगवान प्रवासासाठी ही सुविधा केली असताना वेग मर्यादा आल्याने पालिकेचा वेगवान प्रवासाचा हेतू सफल होताना दिसत नाही.

पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, शहरातील महामार्गावर दोन स्पीडगन बसवण्यात आल्या आहेत. अन्य ठिकाणी त्याची आवश्यकता पाहून मागणी केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.