Chinchwad : कांकरिया शिक्षक दाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 40 हजारांची मदत

एमपीसी न्यूज – डॉ. राजेंद्र कांकरिया आणि छाया कांकरिया या शिक्षक दांपत्याने आपल्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या पेन्शनमधून चाळीस हजार रुपयांची मदत आज (सोमवारी) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे.

मदतीचा हा धनादेश चिंचवड, हवेलीच्या तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. 4 मे 1980 रोजी लग्न झाल्यानंतर हे दांपत्य चिंचवड गावात स्थायिक झाले. आज (दि.4) त्यांच्या लग्नाला चार दशके म्हणजे चाळीस वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी 40 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. हे दांपत्य प्रत्येक दशकपूर्तीला एक वेगळा उपक्रम राबवते.

पहिल्या दशकपूर्तीला 1990 साली त्यांनी स्वत: राहत आसलेल्यि इंदिरा पार्क सोसायटीमध्ये मुलांसाठी ज्ञान विज्ञान बालवाचनालय सुरू केले. दुसऱ्या दशकपूर्ती ला 2000 साली आपले मूळ गाव पाटोदा, बीड व चिचोंडी पाटील, अहमदनगर येथील हायस्कूलमधून दरवर्षी प्रथम येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यास रुपये 2000 शिष्यवृत्ती पुढील दहा वर्षे दिली.

2010 साली तिसऱ्या दशकपूर्तीस महाराष्ट्रातील 10 महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधीस चौथ्या दशकपूर्ती निमित्त चाळीस हजार रुपये दिले.

याप्रसंगी त्यांचे जावई भावेश जैन, चैतन्य बारसावडे तसेच कन्या क्षितिजा जैन व प्रीतिजा बारसावडे आणि 4 वर्षांचा नातू युवांश जैन उपस्थित होते. छाया कांकरिया ह्या गेंदीबाई चोपडा हायस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षिका असून डॉ राजेंद्र कांकरिया शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव आहेत व सध्या ते प्रतिभा महाविद्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.