Chinchwad News : कालीचरण महाराजांच्या शिवतांडव स्तोत्राने गणेश भक्‍त भारवले

श्री संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळाकडून गणेश जयंती उत्साहात साजरी

एमपीसीन्यूज : श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा) यांच्यावतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्या ओजस्वी वाणीतून शिवतांडव स्त्रोताचे गाण करत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी घरांमध्ये जाऊन पोहचलेले कालीचरण महाराज यांनी या कार्यक्रमातही शिवतांडव स्तोत्र गात गणेशभक्‍तांना मंत्रमुग्ध केले. तर हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही आपल्या भाषणात मंडळाच्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले.

यंदाच्या वर्षीही श्री संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळाच्यावतीने गणेश जयंती सोहळा उत्सवात आयोजित केला होता. पहाटे 5.30 वाजता संजय शाळीग्राम यांच्या हस्ते गणेश याग पार पडला. त्यानंतर चिंचवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या हस्ते 51 तोळे चांदीची साखळी चिंचवडच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली.त्यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर जोगेश्वरी महिला भजनी मंडळ यांनी श्रीगणेशाची भजने गात संपूर्ण वातावरण गणेशमय केले होते. सायंकाळी ह.भ.प. मानसीताई बडवे यांच्या सुश्राव्य कीर्तनसेवेने यात आणखीनच भर घातली. धनंजय शाळीग्राम यांनी तबला, तर धनवर्षा प्रभुणे यांनी पेटीवर त्यांना साथ दिली.

थोर शिवभक्त व मॉं कालीचे उपासक कालीचरण महाराज, हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, आमदार महेश लांडगे व पुंडलिक महाराज यांनी चिंचवडच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी देसाई व कालीचरण महाराज यांच्या हस्ते चिंचवडच्या राजाची आरती करण्यात आली.

कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्य करणाऱ्या रौद्रशंभो युवा प्रतिष्ठान, श्री शंकर महाराज सेवा मंडळ, उन्नती फाउंडेशन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन, नामदेव व्हीजन फाउंडेशन, द सत्संग फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, छावा क्रांतिवीर सेना, ए. जी. एन्वायरो, डॉ. रोहन काटे, डॉ. भारती चव्हाण, डॉ. प्रकाश चव्हाण, श्‍यामभाऊ शिंदे युवा मंच, वैष्णवी वेल्हाळ (दापोली), बीएसई कारर्स या सर्वांचा अतिथींच्या हस्ते “कोरोना योद्धा सन्मानपत्र” देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कालीचरण महाराज यांनी गायिलेल्या शिव तांडव स्तोत्रमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांनी गणेश भक्तांसोबत उच्च स्वरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोषाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले.

धनंजय देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरडा जयजयकार नकोय तर आईच्या गर्भात आणि वडिलांच्या रक्‍तात शिवतेज आले पाहिजे. अध्यात्मिक उर्जा प्राप्त झाल्याशिवाय भौतिक उर्जा प्राप्त होत नाही. या मंडळाच्या कार्यकर्त्याला नगरसेवक किंवा आमदार व्हायचे नाही. तरीदेखील त्यांनी समाजकार्याचा डोंगर उभा करून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, कोरोनाचा काळ असो किंवा कोणतीही समस्या असो, ती सोडविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते हिरारीने भाग घेतात. मंडळाच्या स्थापनेपासून आढावा घेतला तर त्यांच्या कामाचा आलेख हा नेहमीच उंचावणारा दिसेल. मंडळाचे कार्यकर्ते संस्कृती जपणारे आहेत.

श्री दत्त कानिफनाथ मंदीर सेवा ट्रस्टचे (इंदोरी) वासुदेव महाराज गरूड यांच्यानतरची परंपरा अखंड सुरू ठेवणारे पंढरीनाथ महाराज गरूड यांनीही मंडाळाच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच भावी कार्यासाठी आशिर्वाद दिले.

कार्यक्रमानंतर कालीचरण महाराज यांनी गांधी पेठेतील विठ्ठल महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी नरेंद्र सायकर आणि नंदू गुरव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर धनेश्‍वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी मंदिराचे विश्‍वस्त उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळाचे महेश मिरजकर, विठ्ठल सायकर, ॲड. मोरेश्वर शेडगे, योगेश चिंचवडे, अमर गावडे, सोपानअण्णा चिंचवडे, दुर्गेश मिरजकर, प्रमोद बरडिया, अविनाश तिकोने, योगेश मिरजकर, अजिंक्‍य राऊत, हर्षल मिरजकर, आदित्य मिरजकर, यश बरडिया, प्रथमेश मिरजकर, मोरेश्वर भदे, मनोज धुमाळ, शैलेश धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.