Chinchwad News : पाहा आणि ऐका, पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काय म्हणतात?

राजकारण करणा-या लोकांबद्दल ते म्हणाले की, 'उनका जो फर्ज है वह अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचें'. 

एमपीसी न्यूज – आपल्याला सुराज्य स्थापित करायचं आहे. शहरातील 99 टक्के लोक कायदा मानणारे आहेत. फक्त एक टक्का लोक गुन्हे करतात तसेच गुन्हे घडविण्यासाठी चालना देतात. असे लोक माथाडीमध्ये असू शकतात, सायबर गुन्हे करणारे असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून गुन्हे करीत आपला प्रभाव निर्माण करणारे असू शकतात. दिशाहीनतेमुळे काही बाल गुन्हेगार असू असतात. या सर्वांना आधी समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही ते गुन्हे करीत राहिले तर मग कारवाई करणार, असा इशारा पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज, शनिवारी दिला.

गुन्हेगारांचे गुन्हे रजिस्टर वाचून मूळ समस्या समजून घेणार. समस्येचे कारण जाणून घेऊन कारवाईला सुरुवात करणार. ‘झीरो टॉलरन्स’ हेच माझे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नव निर्वाचित पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज पदभार स्वीकारला त्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर सुनियोजित शहर आहे. या शहरात 99 टक्के लोक कायदा पाळणारे व त्याचा आदर करणारे आहेत एक टक्का लोक गुन्हेगारी डिझाईन किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे आहेत.  त्यांचा बीमोड करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिन.

सुरुवातीला शहरातील गोष्टींचे अध्ययन करावे लागेल.  येथील समस्या समजून घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचे कृष्णप्रकाश म्हणाले.

राजकीय दबावाबद्दल बोलताना आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले ‘मला कोणत्याही दबावाखाली येण्याची सवय नाही. जे योग्य आहे, कायद्याला धरून आहे ते विनम्रतापूर्वक करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन.

राजकारण करणा-या लोकांबद्दल ते म्हणाले की, ‘उनका जो फर्ज है वह अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचें’.

शहरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांनी कारवाईचा इशारा दिला. कायदा सर्वांसाठी सारखा असेल त्यात लहान मोठा असा भेदभाव केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक ठिकाणी वेगळी कार्यपद्धती असते.  शहराचे अध्ययन केल्यानंतर मी माझी कार्यपद्धती निश्चित करेन असे कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

शहरात एनजीओच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

नागरिकांना आवाहन करताना आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की, सर्वांनी कायद्याचे पालन करावे.  नियम मोडू नयेत. सर्वांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. कायद्यापुढे सर्व समान असतात‌ असे ते म्हणाले.

नागरिकांना अत्यावश्यक प्रसंगात गरज भासल्यास 8805081111 ह्या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, इतर वेळी संदेश पाठवून आपली समस्या सांगावी, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.