Chinchwad : नृत्यकला मंदिरचा अश्विनी पुरस्कार अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांना जाहीर

एमपीसी न्यूज – निगडी येथील नृत्यकला मंदिर ट्रस्ट संचलित (Chinchwad) नृत्यतेज अकादमीच्या वतीने जागतिक नृत्य दिनानिमित्त आयोजित नृत्य महोत्सवात कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच वेळी शास्त्रीय नृत्य आणि अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांना कै. अश्विनी एकबोटे स्मृती पुरस्कार तेजश्री अडीगे यांनी जाहीर केला. मेघमल्हार संगीत महोत्सव 2023 या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी उर्मिला कानेटकर या शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

यावर्षीपासून ज्येष्ठ अभिनेते कै. रविकांत तुळसकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेला कै. रविकांत तुळसकर स्मृती सन्मान पुरस्कार अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी स्विकारला. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार भक्ती नाईक, उत्कृष्ट युवा पुरस्कार आयली घिया, उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आर्या कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, आमदार उमा खापरे, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, तुळसकर घराण्यातील ज्येष्ठ सदस्या शुभदा तुळसकर, नृत्यकला मंदिराच्या संचालिका गुरू तेजश्री अडीगे, नृत्य कला मंदिरचे उपाध्यक्ष अविनाश अडिगे, मार्गदर्शक वाय. व्ही. रत्नम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कै रविकांत तुळसकर यांच्या जीवनावर तेजश्री अडिगे यांनी निर्मित केलेली डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली.

मेघराज राजे भोसले म्हणाले, “कला क्षेत्रात विविध प्रकार व विभाग आहेत. त्यामध्ये नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांची संख्या सर्वाधिक आहे. सर्व कलांचा एकत्रित अभ्यास करता यावा, यासाठी राज्य शासनाकडून कलांचा अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. तशी आखणी शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात येत आहे.”

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “शास्त्रीय नृत्य ही पूजा आहे. अभ्यासाबरोबर कलेला वाव देण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांना एखादी तरी कला शिकवलीच पाहिजे. कलेची सेवा अविरतपणे सुरू ठेवावी. नृत्यकला मंदिराच्या गाभाऱ्यात नामांकित कलावंत घडविण्याचे कार्य तेजश्री अडिगे या (Chinchwad) करीत आहेत.”

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “यशाला शॉर्टकट नसतो. नृत्यकलेकडे एक छंद म्हणून न पाहता करियर म्हणून पाहायला हवे. आयुष्यात एकतरी कला जोपासावी. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. केरळमध्ये प्रत्येक घरात एकतरी कलावंत असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालिका गुरू तेजश्री अडीगे म्हणाल्या, “नृत्यतेजच्या वतीने 22 वर्षांपासून नृत्य शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षीचा नृत्य महोत्सव माझे वडील नाट्य सिनेअभिनेते तथा निवृत्त न्यायाधीश कै. रविकांत तुळसकर यांना समर्पित करीत आहोत.

शिबिरातील सहभागी झालेल्या 5 ते 60 वयोगटातील 70 नृत्य कलाकारांनी कला सादर केली. बालचमूंनी ‘ओ माय फ्रेंड गणेशा’, ‘राजस्थानी घुमर’ नृत्य सादर केले. 9 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांनी ‘राधा बावरी’ गीतावर उपशास्त्रीय, कोळीगीत, बॉलिवूड नृत्य सादर केले. 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांनी बेलीडान्स आणि लावणी नृत्य सादर केले. 20 ते 50 वयोगटातील महिलांनी तेजश्री अडीगे यांच्या सोबत ‘सत्यम शिवम सुंदरम’ या प्रार्थना गीतावर प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

शिबिरामध्ये भारतीय लोकनृत्य व सेमी क्लासिकल नृत्य गुरु अडिगे, बॉलिवूड नृत्य अभिनेता मयुरेश पेम तर बेली डांस हा प्रकार साक्षी तांजे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन गिरिजा आपटे यांनी केले. नृत्यकला मंदिरचे उपाध्यक्ष अविनाश अडीगे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत शिंदे, तेजश्री देशपांडे, अनुष्का बैरागी, धनिष्ठा यादव, विद्युलता खत्री, वीणा भोसले, तन्वी एकदारी यांनी गुरु तेजश्री अडीगे यांना सहकार्य केले.

PMRDA : पीएमआरडीए कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन

रविकांत तुळसकर पुरस्कार विषयी

रविकांत तुळसकर यांनी स्वतःचे घर, व्यवसाय आणि कला उत्कृष्टपणे जगले. न्यायाधीश सारख्या उच्च पदावर काम करूनही ते टीव्ही, चित्रपट,रंगमंच या तिन्ही माध्यमातून रसिकांसमोर झळकले. त्यांचा कलाप्रवास 1965 ते 1996 एवढा होता . हृदविकाराच्या त्रासाने त्यांनी हे काम करणे बंद केले. पण त्यांनी त्यांची वकिली सुरू ठेवली. त्यांच्या प्रमाणे आयुष्याची यशस्वी वाटचाल करणाऱ्या व्यक्तीला ‘कै. रविकांत तुळसकर स्मृती सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.