Chinchwad : दुर्दैव सोसण्याची शक्ती म्हणजे भक्ती – ह. भ. प. श्रेयस बडवे

एमपीसी न्यूज – आपली दु:खे आणि संकंटे स्वामींना कथन करण्यापेक्षा दुर्दैव (Chinchwad) सोसण्याची शक्ती मागणे हीच खरी भक्ती होय!” असे प्रतिपादन ह. भ. प. श्रेयस  आणि मानसी बडवे या दांपत्याने बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे रविवारी केले.

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव 2024 अंतर्गत द्वितीय पुष्प गुंफताना बडवे दांपत्याने कीर्तन जुगलबंदी सादर केली. ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधावडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“भक्तीपाशी देव | घालीतसे उडी | धूत असे घोडी | अर्जुनाची ||
बळीने बांधिला | गोपीने वेष्टीला | पार्थरथी झाला | सारथी जो ||
तुका म्हणे माझी | पुरवावी आवडी | वेगे घाली उडी | नारायणा ||”

Maval BJP : स्थापना दिवस निमित्त मावळ भाजपकडून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

कीर्तनाच्या पूर्वरंगात जगद्गुरू तुकोबांच्या या अभंगावर निरूपण करताना ह. भ. प. मानसी बडवे यांनी प्रचंड (Chinchwad) दुष्काळ पडल्यावर तुकोबांच्या साहाय्याला पांडुरंग धावून आला नाही. कान्होपात्राला गणिका म्हणून जीवन व्यतीत करावे लागले; तर भगवंत दर्शनाची आस घेतलेल्या चोखोबांना प्राणार्पण करावे लागले पण दर्शन घडले नाही, असे दाखले देत उत्तररंगात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र कथन करीत भगवंत भक्तांसाठी धावून येत नाही, असे दावे केले. त्याचा प्रतिवाद करताना ह. भ. प. श्रेयस बडवे यांनी शबरी, अर्जुन, संत नामदेव यांची उदाहरणे देऊन रुक्मिणी आख्यानाच्या माध्यमातून भक्तांच्या आर्त अन् उत्कट हाकेला देव धावून येतो, असे प्रतिपादन केले.

अभंग, भक्तिगीते, श्लोक, नाट्यगीते, पोवाडा, कविता, संतवचने उद्धृत करीत बडवे दांपत्याने नवरसांचा परिपोष करून, “आपल्या वैयक्तिक दु:खांपेक्षाही स्वामी मोठे आहेत. देश महान व्हावा असे वाटत असेल तर सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) आणि मिलिंद तायवाडे (तबला) यांनी साथसंगत केली.

उत्सवात पहाटे 4:30 वाजता श्रींना धन्वंतरी अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार हे धार्मिक विधी संपन्न झाले. सुमारे 225 महिला आणि पुरुष भक्तांनी श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायणात सहभाग घेतला. त्यानंतर महानैवेद्य आणि आरती तसेच सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत झालेल्या रक्तदान शिबिरात 30 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार (Chinchwad)  मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.