Pimpri News : कम्पोस्टिंग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणा-या गृहसंस्थांना मिळणार साफसफाई करात सवलत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात कचरा तयार करणा-या गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वत:ची घनकचरा व्यवस्थापन (कंपोस्टिंग) यंत्रणा उभारल्यास अशा सोसायट्यांना आता साफसफाई करात 20 टक्क्यांपासून 50 टक्क्यापर्यंत सवलत मिळणार आहे. याशिवाय झिरो वेस्ट संकल्पना आणि मलनि:सारण यंत्रणा (एसटीपी प्लँट) कार्यान्वित असलेल्या गृहनिर्माण संस्थांनाही साफसफाई करात 50 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतचा आयुक्तांचा तातडीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील इमारती व जमिनी यावर मालमत्ताकराची आकारणी करण्यात येते. या अधिनियमात लाभदायक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मालमत्ता करातून सूट किंवा परतावा देण्याबाबत तरतुद आहे. महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न करणा-या निवासी सोसायट्यांना घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये ओला कचरा जिरविण्यासाठी ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, मलनि:सारण यंत्रणा (एसटीपी प्लँट) तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास सामान्य करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य विभागामार्फत सादर केलेल्या या प्रस्तावास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 9 ऑक्टोबर 2021 रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कचरा संकलनामध्ये घट होऊन कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी होणा-या खर्चात कपात होणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या स्वच्छाग्रह कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात कचरा तयार होणा-या सोसायट्यांना साफसफाई करामध्ये सवलत दिल्यास कंपोस्टींग करणा-या सोसायट्यांच्या संख्येत वाढ होईल. अशा सोसायट्यांना मालमत्ताकरात सवलत घेता येईल. ही बाब लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात कचरा तयार होणा-या सोसायट्यांमार्फत ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा, मलनि:सारण यंत्रणा (एसटीपी प्लँट) तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास त्यांना बीलाच्या चालू मागणीतील साफसफाई करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित असलेल्या म्हणजेच ओला कचरा पूर्णत: जिरविणा-या निवासी सोसायट्यांना साफसफाई करात 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ओला कचरा पूर्णत: जिरविणा-या व एसटीपी कार्यान्वित असलेल्या निवासी सोसायट्यांना 30 टक्के तर झिरो वेस्ट संकल्पना म्हणजेच ओला व सुका कचरा पूर्णत: जिरविणा-या आणि एसटीपी कार्यान्वित असलेल्या निवासी सोसायट्यांना साफसफाई करात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.