Pimpri News : युरोपियन क्लस्टर सोबतचा सामंजस्य करार परकीय गुंतवणूक व पॉलीमर उद्योगासाठी फायदेशीर ठरेल – आयुक्त राजेश पाटील

ऑटो क्लस्टर आणि पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशन यांचा युरोपियन क्लस्टरच्या शिष्टमंडळासोबत दोन सामंजस्य करारावर स्वाक्षरी

एमपीसी न्यूज – परकीय गुंतवणूक आणि शहरातील पॉलीमर उद्योगाच्या विकासासाठी, युरोपियन क्लस्टरच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सामंजस्य कराराचा फायदा होईल, असे पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त आणि ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले. सोमवारी (दि.04) ऑटो क्लस्टर आणि पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशन यांनी युरोपियन क्लस्टरच्या शिष्टमंडळासोबत दोन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, त्यावेळी आयुक्त पाटील बोलत होते.

यासाठी जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आणि स्लोवाकिया या देशांतील क्लस्टरचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टानी, उपाध्यक्ष संदीप लखाणी, मनोज बर्वे, अश्विन गर्ग, प्रमोद गोरे, नितीन कोंडाळकर, पंकज गर्ग, योगेश बाबर तसेच उद्योग जगतातील नामांकित उद्योगपती आणि प्रतिनिधी उपस्थित होते. ऑटो क्लस्टर आणि पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

आयुक्त राजेश पाटील पुढे म्हणाले, ‘शहरातील पॉलीमर उद्योगाच्या विकासासाठी युरोपियन क्लस्टर सोबतचा सामंजस्य करार महत्वाचा आहे. महानगरपालिका आयुक्त म्हणून अशा उपक्रमांसाठी माझा नेहमीचा पाठिंबा राहील. यामुळे परकिय गुंतवणूक आणि शहरातील उद्योगांना नवीन संधी उपलब्ध होतील. औद्योगिक विकासासाठी याचा निश्चित फायदा होईल,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टानी म्हणाले, ‘पॉलीमर उद्योगाला उभारी देण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्वाचा आहे. यामुळे गुंतवूकीच्या नव्या संधी निर्माण होतील, याचा उद्योगासह रोजगार वाढीसाठी देखील फायदा होईल. शिष्टमंडळ पुण्यात उपलब्ध असलेल्या उद्योगसंधी बाबत सकारत्मक आहे. ऑक्टोंबर महिन्यात होणा-या जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक आणि रबर या आंतरराष्ट्रिय औद्योगिक प्रदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. याचाही उद्योग आणि उद्योजकांना फायदा होईल.’

पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य म्हणाले, ‘बदलेल्या तंत्रज्ञानानुसार प्रगत देशांशी आणि तेथील उद्योगांशी हातमिळवणी करून नवीन संधी निर्माण करणे. क्लस्टर ते क्लस्टर जोडणी करून तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनाचे अदान प्रदान करणे हा ऑटो क्लस्टरचा उद्देश आहे. सोमवारी युरोपियन क्लस्टर सोबत झालेला सामंजस्य करार ही एक घटना नसून नवी सुरूवात आहे. प्लास्टिक उद्योगासाठी यामुळे नवीन तंत्रज्ञान, संकल्पना आणि संधी उपलब्ध होतील.’

कार्यक्रमानंतर जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क आणि स्लोवाकिया या देशातून आलेल्या शिष्टमंडळाने चाकण मधील पॉलीमर उद्योगांना भेट दिली. पुण्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगाला विकासाची संधी उपलब्ध असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.