Manobodh by Priya Shende Part 3 : मनोबोध भाग 3 – प्रभाते मनी राम चिंतीत जावा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक तीन

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

पुढे वैखरी रामा आधी वदावा

सदाचार हा थोर सांडू नये तो

जनी तोचि तो मानवी धन्य होतो

आपण सकाळी जागे झालोत की पहिला विचार रामाचा आला पाहिजे. त्याचं शुद्ध मनाने चिंतन केलं पाहिजे. याचा अर्थ जी काही चांगल्या वाईट विचारांची चक्र डोक्यात चालू व्हायच्या आधी, रामाचे चिंतन सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे आपोआपच रामाचा उच्चार सुरू होईल आणि मग आपला सदाचार म्हणजेच सदाचरण व्हायला लागेल..म्हणजे समर्थ सांगताहेत की चिंतन, उच्चारण आणि आचरण हे ज्यांचे उत्तम असेल, शुद्ध असेल, रामनामाचा असेल तो मनुष्य सकल जनात धन्य मानला जाईल.

 

दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार येता कामा नये आणि केवळ रामचिंतन, रामनाम आणि सदाचरण यांनी जर आपण वागत राहिलो तर मानवी जीवन धन्य होईल.

कोणाला दुःखी न करता जनकल्याण करता आलं तर त्या व्यक्तीला देवत्व बहाल होतं हे समर्थांना अभिप्रेत असावा आपण कितीतरी उदाहरणं पाहतो जसे की संत गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी जनकल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं.

याचा आपण असा अर्थ लावू शकतो का, ही ज्यात आपल्याला यश प्राप्त करायचे मग ते पैशाचं, व्यवसायाचं, बचतीचं, नातेसंबंधात, स्पर्धेत, खेळात, समाजसेवेचे कशातही असुदे, त्याचे उद्दिष्ट किंवा ध्येय आपल्या विचारात सतत भिनलेलं असलं पाहिजे.

सकाळी उठल्याउठल्या डोक्यात तेच चक्र सुरू व्हायला पाहिजे, त्याचीच आठवण, त्याचे चिंतन डोक्यात असलं पाहिजे.  मोठे मोठे कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ जसे सतत यातच गुंतलेले असतात, त्यांच्यासाठी त्यांचा ते काम, ध्येय हेच राम असावा.

आपल्याला पण इतक एकरूप, आपल्या ध्येयाशी होता यायला पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीचा ध्यास आपण घेतो, तेव्हा वाईट किंवा दुसरे कोणते विचार मनात येऊ शकत नाहीत. आपोआप आपले आचरण चांगलं होतं. सतत त्याच गोष्टीत चिंतन-मनन आचरण होतं.  हे जेवढे शुद्ध असेल तितके आपण ध्येयप्राप्तीच्या जवळ जाऊ, असं मला वाटतं आणि मग असा मनुष्य जनी धन्य होतो.

इथे मला सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशी अनेक जगविख्यात मंडळी डोळ्यासमोर येत आहेत.  मरावे परी कीर्ती रुपी उरावे, या आधीची अवस्था म्हणजेच जनी तोच तो मानवी धन्य होतो ही असावी.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.