Dighi : किरकोळ कारणावरून मित्राचा खून

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून मित्राने मित्राचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना गुरुवारी ( दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्रदिप शांताराम तळेकर (वय 31, रा. डुडुळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शांताराम किसन तळेकर (वय 55) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सिताराम विठोबा वहिले (वय 48, रा. शिवराजनगर, डुडुळगाव) असे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप आणि संशयित आरोपी सीताराम हे दोघे चांगले मित्र होते. गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रदीप घरातून बाहेर पडले. सायंकाळी सहाच्या सुमारास डुडुळगाव येथे प्रदीप आणि सीताराम दोघे मित्र बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक भांडण सुरु झाले. प्रदीप यांनी सीताराम याला शिवी दिली. शिवी दिल्याच्या कारणावरून सीताराम याने शेजारी पडलेली फारशी प्रदीप यांच्या डोक्यात घातली. त्यावेळी प्रदीप यांच्या डोक्यातून थोडा रक्तस्त्राव झाला. ही भांडणे झाल्यानंतर प्रदीप सहा वाजता घरी आले आणि झोपले. पैसे वाचविण्यासाठी त्यांनी रुग्णालयात जाणे टाळले. दरम्यान त्यांच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन डोक्यात गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीताराम याला ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्याचे काम सुरु आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.