Dehuroad : भाजी मंडईत ग्राहकांची तुफान गर्दी; शिवसेनेच्या तक्रारीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठीचा राज्यातील “जनता कर्फ्यु” सोमवारी पहाटे ५ वाजता संपुष्टात आला. त्यानंतर सकाळपासून देहूरोड येथील भाजी मंडईत भाजपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली. काही नागरिकांनी तर तोंडाला मास्क न लावताच मंडईत प्रवेश केला होता. ही बाब शिवसेनेच्या पधाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, पोलिसांनी मंडईत धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच टप्प्याटप्प्याने तीन ते चार ग्राहकांनाच मंडईत प्रवेश देण्याची सक्ती केली.

सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच देहूरोडच्या भाजी मंडईत ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे कर्मचारीही गर्दी रोखण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु, भाजीपाला संपेल या भीतीने ग्राहक मात्र १४४ कलम विसरले. ही बाब शिवसेना देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, तसेच देवराज स्वामी यांना समजली. त्यांनी तातडीने देहूरोड पोलीस स्टेशन आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या गर्दीकडे लक्ष वेधले.

त्यानंतर देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सर्वप्रथम सर्व ग्राहकांना मंडईतून बाहेर काढले. ‘भाजी मंडई चालूच राहणार आहे असे सांगत भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी आलेल्या तीन ते चार ग्राहकांना आत पाठवावे. खरेदी करून ते बाहेर आले की पुन्हा तीन ते चार या प्रमाणे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी मंडईत प्रवेश द्यावा अशा सूचना पोलिसांनी केल्या.

_MPC_DIR_MPU_II

भाजी मंडई व मटण मार्केटमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांची ही सूचना मान्य केली. मात्र, भाजी मंडईत जादा दराने भाजीपाला विक्री होत असल्याबाबत ग्राहक चर्चा करू लागले आहेत. भाजी मंडई दिवसभर चालू राहणार आहे. ग्राहकांनी मंडईत गर्दी करू नये. शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

मास्क व सॅनिटायझरची जादा दराने  विक्री

कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी बाजारात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. याचाच फायदा उठवत काही दुकानदार व मास्क विक्रेते मास्कची किंमत ८ ते ९ रुपये असताना ती ३० ते ४० रूपये आणि सॅनिटायझरच्या २०० एमएलच्या बाटलीची किंमत १०० रुपये असताना ती १५० ते ३५० रुपये अशा जादा दराने विकून ग्राहकांची लूट करीत आहेत. या लुटमारीला आळा घालावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू व देवराज स्वामी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.