Dehuroad News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

एमपीसी न्यूज – बौद्धबांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा 66 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) साधेपणाने साजरा करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी, बुद्धविहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करून धम्मक्रांती केली. या निमित्त देशातील हजारो बौद्धबांधव दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येत असतात.

प्रबोधन, गायन, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु, कोरोना महामारीमुळे यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.

मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध पूजा, पंचशील ध्वजारोहन आणि बुद्ध वंदना आदी कार्यक्रम पार पडले. पास देवून नागरिकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. एका पासवर तिघांना दर्शनासाठी सोडले जात होते.

बौद्धबांधवांनी कोरोना नियमांचे पालन करत भगवान बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील निगडीकडून मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.