BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : दिल्लीहून आलेल्या बहिणीच्या फोननंतर पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या भावाचे प्राण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मानसिक संतुलन बिघडलेल्या भावाने आत्महत्या करताना बहिणीला सांगितले. बहिणीने तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी धावपळ करत आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला वाचवले. ही घटना रावेत येथे रविवारी (दि. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्लीहून एक फोन आला. रावेत मधील नॅनो स्पेस होम येथे एका फ्लॅटमध्ये एक तरुण गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नियंत्रण कक्षातून तात्काळ देहूरोड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, पोलीस हवालदार प्रमोद सात्रस यांनी तात्काळ रावेत मधील नॅनो स्पेस होम येथे धाव घेतली. संबंधित फ्लॅटचा दरवाजा बंद होता. आतमध्ये एक तरुण होता.

पोलिसांनी त्याला समुपदेशन आणि सांत्वन करून दरवाजा उघडण्याची विनंती केली. त्याने दरवाजा उघडला असता, त्याने छताच्या पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याची तयारी केली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्याच्या घरचे रविवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी तो घरी एकटाच होता. मानसिक संतुलन बिघडल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले होते. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याच्या दिल्ली येथील बहिणीला फोन करून सांगितले. बहिणीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्याला त्याच्या पालकांच्या सुखरूपपणे ताब्यात देण्यात आले.

पोलीस आयुक्त आर के पदमनाभन यांनी पोलिसांच्या जलद प्रतिसादासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ठराविक क्षेत्रासाठी पोलीस पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जलद प्रतिसाद देणे पोलिसांना सोयीस्कर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणाला वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी काही क्षणांचा विलंब झाला असता तर चित्र वेगळे झाले असते. पोलिसांच्या या यशाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A4

.