Dehuroad : एकसारखी गाडी घेतल्यावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – आवडत्या रंगाची, कंपनीची गाडी घेण्याची हौस एका तरुणाला चांगलीच अंगलट आली आहे. त्याच्यासारखी गाडी यापूर्वी एकाने घेतली असल्याने आपल्यासारखी गाडी घेतल्याच्या रागातून त्याने तरुणाला मारहाण केली. केवळ मारहाणीवर हे प्रकरण थांबले नसून कोयत्याने वार करून जखमी केले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 27) दुपारी साडेचार वाजता पंडित चाळ देहूरोड येथे घडला आहे.

रोहित बजरंग सकट (वय 17, रा. गांधीनगर, देहूरोड), संतोष अन्नामले अशी जखमी तरुणांचे नावे आहेत. रोहित यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्की मालगे, साहिल पासवान, भरत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की याने मागील काही दिवसांपूर्वी एक दुचाकी विकत घेतली. त्यानंतर त्याच रंगाची आणि कंपनीची दुचाकी फिर्यादी रोहित यांनी देखील घेतली. आपल्यासारखी दुचाकी जाणीवपूर्वक घेतल्याच्या संशयातून विक्कीला राग आला. गुरुवारी दुपारी रोहित त्यांचे मित्र संतोष अन्नामले, करण सकट, प्रेम ढिलोढ यांच्यासोबत शिवाजी विद्यालयाच्या मागे पंडित चाळ येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी विक्की त्याच्या दोन साथीदारांना घेऊन तिथे आला. ‘तू माझ्यासारखी गाडी का घेतली?’ असे म्हणत दमदाटी करत रोहितवर कोयत्याने वार केले. तसेच रोहित यांचा मित्र संतोष याला लोखंडी रॉडने पायावर व डोक्यात मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.