Rathani: ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यांमुळे तापकिरनगरवासीय त्रस्त

माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या कामासाठी महापालिकेतर्फे विविध ठिकाणी खणण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे काळेवाडी भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत. खड्डे बुजवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत मच्छिंद्र तापकीर यांनी निवेदन दिले आहे. महापालिका ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागातर्फे काळेवाडी, तापकीरनगर, ज्योतिबानगर आदी भागामध्ये ड्रेनेज, तसेच पाणीपुरवठ्याच्या कामासाठी खड्डे खणण्यात आले आहेत. मात्र, ही कामे करताना नियोजनाचा अभाव असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खणण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अंडरग्राऊंड असलेल्या ‘महावितरण’च्या केबल अनेक ठिकाणी तुटल्या आहेत.

परिणामी, या भागातील विजपुरवठा वारंवार खंडीत होवून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत विचारणा केली असता ‘महावितरण’च्या अधिका-यांनी महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवून त्यांच्या नियोजनशुन्य कारभारावर ठपका ठेवला आहे. विकासकामे झाली पाहीजेत. परंतू, ती होताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाने घ्यायला हवी. त्यामुळे नागरिकांना त्रास न होता कामाचे योग्य नियोजन करण्याचे आदेश संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याना द्यावेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तापकीर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.