Punavale Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथील कळमजाई मंदिरासमोर पवना नदीवरील ब्रिजवर घडली.

संदीप अशोक मोटे (वय 38) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा चुलत भाऊ ओंकार मनोहर मोटे (वय 27, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संदीप मोटे हे दररोज सकाळी चालण्यासाठी जातात. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ते मुंबई-बेंगलोर महामार्गावरून चालत जात असताना आठ वाजताच्या सुमारास पवना नदीवरील ब्रिजवर आले. तिथे त्यांना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी न थांबता आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.