Dighi Crime : शिवीगाळीचा जाब विचारल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन भावांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी दिघी येथे घडली.

सूरज आणि किरण (पूर्ण नाव माहिती नाही. रा. महादेवनगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनोज अर्जुन कुंभार (वय 45, रा. महादेवनगर, कॉलनी क्रमांक चार, दिघी) यांनी शनिवारी (दि. 31) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी महादेवनगर येथून चालली होती. त्यावेळी रस्त्यावर आप्पारप्पी खेळणाऱ्या एका मुलाने फिर्यादी यांच्या मुलीस बॉल मारला. त्यामुळे तिने बॉल मारहाणाऱ्या मुलास चापट मारली. या कारणावरून तिथे असलेल्या किरण नावाच्या आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ केली.

घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रकार फिर्यादी मनोज यांना सांगितला. मनोज हे याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांची आरोपी किरण व सूरज यांच्याशी बाचाबाची झाली. फिर्यादी हे आरोपींच्या आई-वडिलांशी बोलत असताना तिथे पुन्हा आलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून मनोज यांना जबर जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.