Bhosari : मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर खुनी हल्ला

Murder attack on the brother of a young man who was involved in the murder of a friend.

एमपीसी न्यूज – मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर पाच जणांनी मिळून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली.

दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोतीरावे उर्फ काळ्या (वय 20, रा. भोसरी), आकाश शर्मा (वय 22, रा. भोसरी), मंगेश साठे (रा. भोसरी) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सुभाष शेखापुरे (वय 22, रा. आळंदी रोड, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात वर्चस्ववादातून मयूर मडके याचा खून झाला. या खूनात फिर्यादी संजय शेखापुरे याचा भाऊ देखील सहभागी होता. या कारणावरून आरोपींनी शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास संजय यांना शिवीगाळ करत आरडा ओरडा करून दहशत निर्माण केली.

आजूबाजूच्या लोकांनी घाबरून दुकाने बंद केली. त्यावेळी हातात कोयता घेऊन आरोपी दशरथ याने संजय यांच्या हातावर मारला. संजय कोयत्याचा वार अडवत असताना सौरभ याने कोयत्याने संजयच्या डोक्यात वार केला. संजय यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी आकाश, मंगेश आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून संजय यांना खाली पाडले आणि लाथांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.