Thergaon News: शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध – जयश्री येवले

एमपीसी न्यूज – शालेय उपक्रमांमधून सुप्तगुणांचा शोध घेण्याची संधी विद्यार्थ्यांना लाभत असते म्हणून त्यात सहभागी होऊन संधीचे सोने करीत व्यक्तिमत्त्व समृद्ध करा!” असा कानमंत्र ह.भ.प. जयश्री येवले यांनी गणेशनगर, थेरगाव येथे विद्यार्थ्यांना दिला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यामंदिर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभी मार्गदर्शन करताना जयश्री येवले बोलत होत्या.

याप्रसंगी जनलोक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुनंदा कदम, सहखजिनदार शशिकला भोंग, सदस्य सविता कांचन, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालक आसाराम कसबे आदी उपस्थित होते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थी अन् पालक यांचा उत्साह सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करणारा होता.

आकर्षक फलकलेखन, स्वच्छता, टापटीप, सजावट केलेल्या शालेय संकुलात शैक्षणिक लेखन साहित्याचे वितरण करून शिक्षकवृंद आणि कर्मचारीवर्गाने हसतमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी शालेय परिसरात जनजागृती फेरी काढून गणरायाचे आशीर्वाद घेतले.

Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool : दुर्घटना घडल्याने तलाव बंदच ठेवणे हा उपाय नाही; तलाव पुन्हा सुरु करण्याची मागणी

जनजागृती फेरीमध्ये वासुदेवाच्या वेषभूषेतील आसाराम कसबे आणि शिवाजी पोळ या जोडीने स्वरचित गीतांमधून शिक्षण, ज्ञान आणि मनोरंजनाचे महत्त्व पटवून दिले. सुनंदा कदम यांनी ‘खूप मोठे व्हा, संस्कारसंपन्न व्हा!’ असा आशीर्वाद आपल्या मनोगतातून दिला. सविता कांचन यांनी शुभेच्छा दिल्या; तर ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील जिव्हाळ्याचे दर्शन फक्त मराठी माध्यमाच्या शाळेमधून होते!’ असे मत शशिकला भोंग यांनी व्यक्त केले. यावेळी लहान गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या इयत्ता सातवीतील विजय गायकवाड या विद्यार्थ्यांचा तसेच ‘सानेगुरुजी शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक नटराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

ह.भ.प. जयश्री येवले पुढे म्हणाल्या की, “माझ्यातील कीर्तनकाराची ओळख मला विद्यार्थिदशेतच झाली. आता झी मराठी, सह्याद्री, मराठी बाणा इत्यादी वाहिन्यांवर माझे कीर्तनाचे कार्यक्रम होत असताना मी खिंवसरा पाटील विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. आज कीर्तनकार म्हणून नव्हे तर तुमची मोठी ताई या नात्याने तुमच्याशी संवाद साधताना तसेच शाळेची प्रगती पाहताना मला खूप आनंद होतो आहे!”

पाठ्यपुस्तकांचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. माधुरी कुलकर्णी, मीना जाधव, वीणा तांबे, सीमा आखाडे, गणेश शिंदे, संदीप बरकडे, कृतिका कोराम यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले. नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध घेत रमलेल्या आनंदी मुलांमुळे शाळा पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने गजबजली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.