Pimpri : छत्रपतींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉ. कोल्हे शिरूरचा विकास करतील : सचिन साठे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच शिरूर मतदारसंघाचा विकास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे करतील, असा विश्वास पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.

शिरूर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ नुकताच भोसरी ब्लॉक काँग्रेस कमिटीची बैठक  सचिन साठे  व माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी येथे घेण्यात आली. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, भोसरी ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, माजी नगरसेवक अरूण बो-हाडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, एनएसयूआयचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.

साठे यांनी यावेळी सांगितले की, सलग 15 वर्ष शिरूरचे प्रतिनिधित्व करणा-यांनी या भागातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले. त्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळेच नियोजित विमानतळ रद्द झाले. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम ठिकठिकाणी त्यांनी अडवून ठेवले आहे. पुणे नाशिक महामार्गालगत महाराष्ट्रात सर्वात जास्त एसईझेड (स्पेशल इकॉनॉमिक झोन) विकसित करण्यात येणार होते. परंतू चौकार मारण्याचे स्वप्न बघणा-यांनी या ‘एसईझेड’ला विरोध करीत येथील शेतकरी,  कष्टक-यांची व बेरोजगार युवकांची दिशाभूल केली. महाआघाडीच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करून युतीच्या उमेदवाराने स्वत:चेच नाव कमी करून घेतले आहे.

युतीच्या उमेदवाराने महाआघाडीच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख करताना किमान  आपल्या नावाची जाणीव ठेवावी, असा टोला सचिन साठे यांनी आढळरावांचे नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करून घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे हे महाआघाडीचा जाहिरनामा या भागात वेगाने विकसित करतील. तुळापूर वडू बुद्रुक व शिवनेरी आणि या भागातील महत्वाच्या स्थळांना पयर्टन स्थळांचा विकास करण्यासाठी डॉ. कोल्हे प्रयत्न करतील, असाही विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला. स्वागत विष्णूपंत नेवाळे, सुत्रसंचालन मयूर जैसवाल तर आभार विशाल कसबे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.