Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चा छापा, विद्यमान गृहमंत्री म्हणतात…

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज (शुक्रवारी) छापा टाकला आहे. यावर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणे उचित ठरणार नाही.

ईडीने 11 मे रोजी मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. महिन्याभरापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. आता आज पुन्हा छापा टाकला आहे. देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे छापा टाकला, असे वृत्त मराठी वाहिन्यांनी दिले आहे.

याबाबत मी काही बोलण्याची गरज आहे, असे वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे.  हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणे उचित ठरणार नसल्याचे सांगत मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सीबीआय चौकशीत काही सापडले नाही. 10 वर्षांपूर्वीची प्रकरणे उकरून काढून छापेमारी सुरू आहे. याचा अनुभव सर्वांना येत आहे.  केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्रास दिला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. विनाकारण त्रास दिला जात आहे. जमिनींचे व्यवहार काढायचे असतील. तर, ईडी आणि सीबीआयसाठी फिट केस अयोध्येतील राम जन्मभूमी न्यासाबरोबर झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची केंद्रीय तपास यंत्रणांनी जाऊन तपासणी करणे गरजेचे असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.