End of serial Ratris Khel Chale: मालिकेच्या शेवटी नखरेल शेवंता झाली भावुक

नुकतीच ही मालिका संपल्यानंतर अपूर्वाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत आणि सेटवरील फोटो अपलोड करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एमपीसी न्यूज – कोकणातल्या भुताखेतांच्या अफवांवर वेगळ्या दिशेने प्रकाश टाकणा-या झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले– 2’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. शनिवारी 29 ऑगस्ट रोजी अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा दुसरा भाग आधी प्रदर्शित झाला होता. आणि पहिल्या भागात काय घडले होते ते नंतर समोर आले. या ट्विस्टमुळे मालिकेविषयीची उत्कंठा चांगलीच वाढली होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांची कामे प्रचंड गाजली. पण सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली ती शेवंता झालेल्या अपूर्वा नेमळेकर हिला. तिच्या ग्लॅमरस लूकची या मालिकेच्या निमित्ताने चर्चा झाली.

नुकतीच ही मालिका संपल्यानंतर अपूर्वाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत आणि सेटवरील फोटो अपलोड करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात शेवंता म्हणजेच अपूर्वा भावनिक झाली आहे.

आपल्या पोस्टमध्ये अपूर्वा म्हणत आहे, ‘नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात… वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..’

‘या मालिकेचा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठीचे मनापासून आभार मानते…त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याबद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्तीला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच. पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे’.

‘पहिल्या भागाचे गुपित या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारुन मी पुन्हा टीव्हीवर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्याबरोबरच इतर सगळ्यांचा या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता’.

‘हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलंही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतं तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही वाटत आहे.’

‘शेवंतांचे विविधरंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तिरेखाबद्दल फक्त आपण ऐकले होते, पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढतच गेले,

आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्याबद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत राहावा, ही विनंती

एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन ,
बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती
माझा पॅकअप झाल्यानंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरुप फोटो
आणि आज मस्तिष्कावर पडलेले ही पुष्प पाकळी
यांने माझे मन गहिवरुन गेले’.

कोकणातले हुबेहूब गाव दाखवायचे असल्याने यावेळी प्रथमच सिंधुदुर्गातल्या आकेरी इथल्या एका वाड्यात मालिकेचे शूटींग करण्यात आले. या मालिकेमुळे हा वाडा देखील फेमस झाला आहे. आधी रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या भागाने देखील लोकप्रियता मिळवली होतीच. तीच लोकप्रियता दुस-या भागाने देखील मिळवली. आता त्या टाइमस्लॉटमध्ये आजपासून ‘देवमाणूस’ ही आणखी एक सस्पेन्स थ्रिलर मालिका आजपासून सुरु होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.