Pune News : कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘महा कला मंडल’ या शिखर संस्थेची स्थापना

Establishment of an organization called 'Maha Kala Mandal' to solve the problems of artists.

एमपीसी न्यूज – नाटक, चित्रपट, शाहीरी, लोककला आदी विविध कला क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करणार्‍या लाखो कलाकारांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत, या कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील कला  क्षेत्रातील 65 हून अधिक संस्था एकत्र आल्या आहेत. गुरुवारी (दि.13) पुण्यात झालेल्या बैठकीत ‘महा कला मंडल’ या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली.

या बैठकीत महा कला मंडलच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत खाबिया यांची निवड करण्यात आली. या बैठकीत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्राविषयी चर्चा केली.

या प्रसंगी निर्माते उदय साटम, संतोष परब, चौफुला कला केंद्राचे मालक अशोक जाधव, जितेंद्र भुरुक, संदिप पाटील, अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, संभाजीराजे जाधव आदींसह 67 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी मेघराज राजेभोसले म्हणाले, महाराष्ट्रातील कलाकारांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आहे. यानिमित्ताने 67  संघटना एकत्र येऊन कलाकारांच्या हितासाठी काम करणार आहेत.

माझी अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. कलाकारांचे प्रश्न याद्वारे सोडविले जातील. पुढील काळात या माध्यमातून आम्ही मराठी कलाकारांच्या प्रश्नांसाठी आणि हितासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत.

सरकारने कलाकारांसाठी  महामंडळ स्थापन करावे, कलाकारांच्या आरोग्य विम्याचा प्रश्न सोडवावा, प्रवास खर्चात सूट द्यावी आणि त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवावी असे मुद्दे मांडणार आहोत.

लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, कला संघटना एकत्र आल्यामुळे आता कलाकारांचे प्रश्न लवकरच सुटतील. राज्यातील कलाकारांची नोंदणी, आरोग्य विम्याचा लाभ, नोकर्‍यांमध्ये संधी, ऑनलाईन कार्यक्रमांना होणार्‍या कायद्याच्या अडचणी सोडविणे, कलाकारांचे वादविवाद सोडविणे, स्थानिक कलाकारांना काम मिळणे,  राज्यपातळीवर एकच मानधन असावे,  कलावंतांच्या मुलांसाठी शिक्षण सुविधा, प्रत्येक जिल्ह्यात कलाभवन असावे आदी विविध प्रश्न मांडणार आहोत. या संस्थेची संपूर्ण माहिती www.mahakalamandal.com या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.