Pimpri News : स्वच्छतेच्या चळवळीत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नागरी सहभाग आणि सहकार्य आवश्यक असून स्वच्छतेच्या या चळवळीत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी झाले आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर तसेच वॉर्ड निहाय समन्वय अधिका-यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विविध अधिका-यांकडे कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवना मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहशहर अभियंता सतिश इंगळे, संजय कुलकर्णी , माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त सुभाष इंगळे , संदीप खोत, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, शितल वाकडे, रवि घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापु गायकवाड, प्रशांत पाटील, शिरीष पोरेड्डी, रविंद्र पवार, राजेंद्र पवार, थॉमस नरोन्हा, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छतेच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग आणि सहकार्यामध्ये वाढ करणे आवश्यक असनू त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. ते म्हणाले, स्वच्छतेची चळवळ ही लोकसहभागाची चळवळ आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य महापालिका प्रशासनाला मिळावा यासाठी अधिका-यांनी नागरिकांशी निरंतर संवाद साधला पाहिजे. कचरा विलगीकरणाचे महत्व त्यांना पटवून दिले पाहिजे. आपल्या शहराने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला असून या शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्याचा संकल्प केला असल्याची जाणीव प्रत्येकामध्ये रुजणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने अधिका-यांनी जनजागृतीकरीता उपक्रम राबवावेत.

नागरिकच ही मोहिम यशस्वी करू शकतात. या मोहिमेस नागरिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महापालिका काम करत असून लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संस्था, गृह सोसायट्यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था देखील यासाठी सहकार्य करीत आहेत. कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांना माहिती देणे आणि त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. शहराच्या चांगल्या बदलासाठी नागरिक आता पुढाकार घेत आहेत ही शहर स्वच्छतेसाठी चांगली बाब आहे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करण्यासाठी तेथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या. त्या ठिकाणी ड्रेनेज, रस्ते, सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबाबतचे प्रश्न समन्वयाने मार्गी लावावेत. बचत गटांची मदत घेऊन कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करावी. कंपन्यांमधून निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावणेबाबत संबंधित कंपनी अधिका-यां समवेत बैठका घेवून निर्णय घ्यावा आदी सूचना देखील आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.