Pune : महाविकास आघाडीकडून पुणेकरांना विकासाची अपेक्षा

एमपीसी न्यूज – राज्यात काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुणेकरांनाही विकासाच्या अपेक्षा आहेत. महापालिकेत 23 गावांचा टप्याटप्याने समावेश, दोन वेळा शुद्ध पाणीपुरवठा, शिवसृष्टी, बिडीपी, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘एचसीएमटीआर’, पुणे मेट्रो, ‘पीएमआरडीए’, विकास आराखडा, बसेस खरेदी, 11 गावांचा विकास आराखडा, रिंगरोड, ‘हायपरलूप’, अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांची भाजपने घोषणा केली. हे प्रकल्प पूर्ण करणे आता महाविकास आघाडीचे काम आहे.

काँगेस – राष्ट्रवादीची सत्ता असताना वरील प्रकल्प 15 वर्षे रखडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या विकासाला गती दिली. 8 आमदार, पुणे महापालिकेत 99 नगरसेवक, केंद्रात आणि राज्यात एक हाती भाजपची सत्ता असल्याने त्याचा लाभ झाला. आता परिस्थिती बदलली आहे. पुणे शहरात भाजपचे 6 आमदार आहेत.

वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. दोन मतदारसंघांत पराभव झाल्याने भाजपने महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर इतर नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी हे पदाधिकारी बद्दलल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, पिंपरी ते स्वारगेट आणि वणाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्याला गती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. पुणेकरांना लवकरात लवकरच मेट्रोत बसण्याचे स्वप्न पूर्ण करावे लागणार आहे. या दोन मार्गांव्यतिरिक्त शहराच्या इतर भागांतूनही मेट्रोला मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.