Pimpri : हयात नसलेल्या व्यक्तीच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे घराचा व्यवहार

एमपीसी न्यूज – हयात नसलेल्या व्यक्तीची बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर करून त्याच्या नावावरील घर स्वतः खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला विकले. हा प्रकार 5 जुलै 2013 ते 11 एप्रिल 2014 या कालावधीत दस्त नोंदणी कार्यालय पिंपरी येथे घडला.

हरिराम माधवराव जसोतानी (वय 77, रा. पिंपरी कॉलनी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष हिरालाल यादव (वय 35, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव), अनिल रंगनाथ आढाव (वय 40, रा. पुणे) यांच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिराम यांचे चुलते कालाचंद उर्फ सेवाराम जसोतानी यांचे 2009 साली निधन झाले. त्यांच्या घरात हरिराम यांचे कुटुंब राहत आहे. आरोपी संतोष याने 5 जुलै 2013 रोजी हरिराम यांच्या मयत चुलत्यांच्या जागी अज्ञात एक इसम उभा करून त्याचे आधारकार्ड बनविले. त्याआधारे बनावट कागदपत्रे तयार करून हरिराम राहत असलेल्या घराचा बनावट दस्त तयार केला. हा दस्त नोंदणी कार्यालयात सादर केला. त्यातून हरिराम राहत असलेले घर संतोष याने खरेदी केले. त्यानंतर काही दिवसांनी ते घर त्याने अनिल याला विकले. यामुळे हरिराम यांनी संतोष, अनिल आणि एका अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिसांनी संतोष याला मंगळवारी (दि. 23) अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.