Chakan : कांद्यावरील निर्यात शुल्कवाढी नंतर शेतकरी आक्रमक; चाकण येथे चक्काजाम आंदोलन

भाजप सरकारची वृत्ती सूड भावनेची - नाना पटोले.,

एमपीसी न्यूज : शेतकऱ्यांना फसवी आश्वासने देणाऱ्या (Chakan) भाजप सरकारची वृत्ती सूड भावनेची असून, या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विनाकारण काही लोकांवर कारण नसताना प्रशासनाला हाताशी धरून या सरकारने गुन्हे दाखल करायला लावले. ही बाब धक्कादायक असल्याचा घणाघात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी येथे केला.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावल्याने त्याचे तीव्र पडसाद चाकण येथे बुधवारी ( दि. २३ ) उमटले. त्या पार्श्वभूमीवर चाकण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनात नाना पटोले बोलत होते. प्रारंभी पटोले यांच्यासह आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे – नाशिक महामार्गावर कांदा ओतून ठिय्या आंदोलन केले.

त्यामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना सातपुते, तालुकाध्यक्ष विजय डोळस, कांदा – बटाट्याचे व्यापारी जमीर काझी, कॉंग्रेसचे चाकण शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड, मयूर आगरकर, अनुराग जैद, विजय डोळस, संग्राम मोहोळ, दादुभाई खान, उत्कर्षा रुपवते, अमोल जाधव, दत्ता गोरे, जया मोरे, अनिल देशमुख, अशोक जाधव, बापू दिघे, विक्रम शिंदे, काळूराम कड, कुमार गोरे, भास्कर तुळवे, राम गोरे आदींसह कांदा उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाना पटोले यांनी यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केटमधील (Chakan) व्यापारी व शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. याप्रसंगी बाजार समितीच्या वतीने सभापती कैलास लिभोरे, संचालक महेंद्र गोरे, विजय शिंदे, सचिव बाळासाहेब धंन्द्रे आदींच्या हस्ते पटोले यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना पटोले म्हणाले,” भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणाची टांगती तलवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ठेवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनेक वेळा आर्थिक संकटात ढकलले आहे.

Chandrayaan 3 : चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम लॅंडरचा चंद्र स्पर्श; चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्क लावून अप्रत्यक्ष कांदा निर्यातबंदीद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी देऊन उदासिनतेचे धोरण कायम ठेवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याला उत्पादन खर्चाची निर्धारित किंमत निश्चित करून त्यापेक्षा अधिक दर मिळण्याची मागणी पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. शासनाने किमान उत्पादन खर्चाची किंमत निर्धारित करून त्यापुढे खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे आवश्यक आहे.”

आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले,” रब्बीतील उन्हाळी कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भविष्यात कांद्याचे दर वाढतील, या मोठ्या अपेक्षेने कांद्याची साठवणूक केली. परंतु मोठा भांडवली खर्च करूनही कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याऐवजी दर नियंत्रणासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.” यावेळी संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मनोगतातून केंद्र सरकारचा निषेध केला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून चाकण परिसर दणाणून सोडला.

काही वेळ वाहतूक कोंडी –

” कांद्यावरील निर्यात शुल्क वाढीनंतर आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे – नाशिक महामार्गावर ठिय्या मांडल्याने चाकण येथे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी नाशिक बाजूकडून भरधाव आलेल्या रुग्णवाहिकेला पुणे बाजूकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात आला.”


चाकणला आले पोलीस छावणीचे स्वरूप –

“चाकण येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या न भूतो न भविष्यती अशा हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकणला तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे चाकणला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या अंतर्गत येत असलेल्या महाळुंगे इंगळे एमआयडीसी, आळंदी, दिघी व चाकण पोलीस ठाण्यातील वीस पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण एकशे बारा पोलीस कर्मचारी आणि एक दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.